

rain fall
solapur
सोलापूर : जिल्ह्यात सोमवारी (ता. २३) दुपारी चारनंतर वादळाला सुरवात झाली. अर्ध्या-पाऊण तासांनी काही ठिकाणी अवकाळीच्या धारा कोसळल्या. त्यामुळे अतिवृष्टी, महापुरातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या वादळाचा व अवकाळीचा फटका पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा, मका भुईसपाट झाली. तर आंबा, द्राक्ष, केळी बागांनाही त्याचा फटका बसला.
पंढरपुरात पावसाच्या हलक्या सरी
पंढरपूर शहर व परिसरात सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तालुक्यातील कोर्टी, वाखरी, टाकळी, गोपाळपूर, शेगाव दुमाला, कासेगाव या भागात काही प्रमाणात हलका व तुरळक पाऊस झाला. अत्यंत कमी पाऊस झाल्याने काढणीला आलेली गहू आणि ज्वारी पिके मात्र अवकाळीतून वाचली आहेत.
------------------------------------------------------------------
भोसे, हुन्नूर परिसरात नुकसान
आज दुपारी अचानक मंगळवेढा तालुक्यातील भोसे, हुन्नूर आदी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान झाले. सध्या दक्षिण भागात ज्वारी, मका, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरू असून बहुतांश शेतकऱ्यांनी मका मोडून शेतात टाकलेला असताना, गहू कापून शेतात पडलेला असताना तसेच ज्वारीच्या पेंड्या शेतात पडलेल्या असताना अचानक दुपारी तीनच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला असून काही ठिकाणी द्राक्ष उतरणी सुरू असताना व शेडमध्ये द्राक्ष टाकत असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
सांगोला परिसरातील शेतकऱ्यांना धास्ती
सांगोला शहर व तालुक्यातील अनेक भागांत आज सोमवारी (ता. २३) सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे द्राक्ष व ज्वारीसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षांत डाळिंबाच्या क्षेत्रात घट होऊन द्राक्ष बागांचे क्षेत्र वाढले आहे. सध्या अनेक ठिकाणी द्राक्ष पिके परिपक्व होऊन विक्रीसाठी तयार झाली होती. अशातच झालेल्या पावसामुळे द्राक्ष घडांना तडे जाणे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे व दर्जा खालावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारभावावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहर परिसरात हलका पाऊस झाला असला तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळल्या. शहरात सायंकाळी हलका पाऊस झाला असला तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून येत होत्या.
मंद्रूप, भंडारकवठे परिसरात तडाखा
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, भंडारकवठे परिसरात आज झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या पावसामुळे द्राक्ष, ज्वारी आणि गहू पिकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. भंडारकवठे आणि मंद्रूप पट्ट्यातील द्राक्ष बागा सध्या फळ पक्व होण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे आणि कुजण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे. तसेच परिसरातील मुख्य पीक असलेल्या ज्वारी आणि गव्हालाही या पावसाचा जोरदार फटका बसला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी परिसरात पाऊस
वादळी वाऱ्यासह पावसाने वागदरी (ता. अक्कलकोट) परिसरात हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण होते. आज सकाळपासून हवेत उकाडा होता. सकाळपासून ढग जमा व्हायला लागले होते. साडेचार वाजता वादळी वारा व विजेचा कडकडाट सुरू झाला. पाच वाजल्यापासून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाली. वागदरीसह गोगाव, खैराट, भुरीकवठे, किरनळी, शिरवळवाडी, सदलापूर, शिरवळ या परिसरात पाऊस झाला आहे.
बार्शी तालुक्यातील वैराग भागालाही फटका
वैराग शहर व परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांसह गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांना तडाखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. यावर्षी अगोदरच अतिवृष्टीने बेजार झालेला बळीराजा या अवकाळीमुळे दुहेरी संकटात सापडला आहे. द्राक्षबागांवर महागडी खते, औषधे तसेच छाटणी, फवारणी, मजुरी याचा मोठा खर्च झाला आहे. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे पिके उभी केली होती; मात्र या खराब वातावरणामुळे व अवकाळीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.