मृत्यूदर कमी करण्यासाठी सोलापूरने टाकले महत्त्वाचे पाऊल 

प्रमोद बोडके
Thursday, 2 July 2020

सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयासह सर्वच प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. सोलापुरात प्लाजमा थेरपीचा शुभारंभ ही आपल्यासाठी खूप जमेची बाजू आहे. कोरोनामुक्त झालेल्या 20 ते 50 वयोगटातील व्यक्तींनी (इतर कोणताही आजार नसलेले) प्लाजमा देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. ज्या व्यक्तींना प्लाजमा द्यायचा आहे त्यांनी रक्तपेढ्या, वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी संपर्क साधावा. 
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 

सोलापूर : अवघ्या 82 दिवसांमध्ये कोरोनाने सोलापुरात थैमान घातले. 82 दिवसांमध्ये सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या (1जुलैच्या अहवालानुसार) 2 हजार 727 व कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 273 एवढी झाली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढतच असताना आता एक सकारात्मक घटना समोर येऊ लागली आहे. सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. 

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनाच अधिक आहे. सोलापुरात आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या 273 व्यक्तींपैकी तब्बल 80 टक्के व्यक्ती या ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी या दोन घटकातील व्यक्तींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन व राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. सोलापुरात अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसाच एक महत्त्वाचा निर्णय प्लाजमा थेरपीच्या बाबतीत घेण्यात आला आहे.

सोलापुरातील वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात प्लाजमा थेरपीला सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या थेरपीचा शुभारंभ झाला आहे. सोलापूरसह राज्यातील 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या थेरपीचा शुभारंभ झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींकडून प्लाजमा घेण्यात येत आहे. सोलापुरात पाच व्यक्तींनी प्लाजमा दिला असून सध्या प्लाजमा संकलन व साठवण करण्याचे काम सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुरू आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ व्यक्तीची राज्याच्या नोडल अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

त्यांच्याकडे राज्याच्या प्लाजमा थेरपीच्या नियोजन आणि नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोलापुरात सुरू झालेले प्लाजमा संकलन कोरोनाग्रस्त गरजूंना देण्याची प्रक्रियाही सोलापुरातच राबविली जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली साधन सामग्री सध्या उपलब्ध आहे. नोडल ऑफिसरची परवानगी येत्या एक ते दोन दिवसात मिळेल अशी माहिती वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. ही परवानगी मिळाल्यानंतर सोलापुरातील कोरोनाग्रस्तांना (ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे असे) या प्लाजमा दिल्या जाणार आहेत. 
 
कोरोनामुक्त झालेल्यांचा पुढाकार महत्त्वाचा 
सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, मृतांची संख्या वाढत असली तरीही कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. सोलापुरातील 2 हजार 727 कोरोनाबाधितांपैकी 1 हजार 490 जण कोरोनामुक्त झाले आहे. सोलापुरातील कोरोनामुक्तीचा दर हा 60 ते 65 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. ज्या कोरोनाग्रस्त व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा व्यक्तींना प्लाजमा थेरपीच्या माध्यमातून प्लाजमा दिल्या जाणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील प्लाजमांचा उपयोग कोरोनाग्रस्त व्यक्तींसाठी केला जाणार असल्याने सोलापुरात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी करता येईल असा विश्‍वास व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur takes important steps to reduce mortality