बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात सोलापूर वरचढ 

संतोष सिरसट 
Thursday, 16 July 2020

तालुकानिहाय निकालाची टक्केवारी 
अक्कलकोट-90.70, बार्शी-93.81, करमाळा-89.62, माढा-95.09, माळशिरस-92.40, मंगळवेढा-97.30, मोहोळ-95.62, पंढरपूर-95.36, सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर-92.92, सांगोला-95.70 टक्के. 

सोलापूर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा निकाल आज जाहीर झाला आहे. पुणे विभागात या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यात सोलापूरचा निकाल सर्वाधिक 93.74 टक्के इतका लागला आहे. 

अनेकवेळा पुणे विभागात पुणे व नगर या दोन जिल्ह्यांनीच बाजी मारलेली असते. मात्र, यंदाच्या वर्षी हा मान सोलापूर जिल्ह्याने पटकाविला आहे. यंदाच्या वर्षीच्या बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर दहावीच्या परीक्षेत कोरोनाचा अडथळा आला. परीक्षा मंडळाला दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला. त्यानंतर मंडळाने सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षेत यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातून 53 हजार 740 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी 53529 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. बारावीच्या परीक्षेत 50 हजार 178 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.74 टक्के इतकी आहे. पुणे जिल्ह्याची टक्केवारी 92.24 तर नगर जिल्ह्याची टक्केवारी 91.97 टक्के इतकी आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांपेक्षा सोलापूरचा निकाल सर्वाधिक आहे. 
सोलापूर जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी 23 हजार 236 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 22 हजार 886 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी 98.49 टक्के इतकी आहे. कला शाखेसाठी 19 हजार 865 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 17 हजार 561 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 87.96 टक्के इतकी आहे. वाणिज्य शाखेसाठी आठ हजार 379 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सात हजार 995 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्याची टक्केवारी 95.42 टक्के इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण 53 हजार 529 विद्यार्थ्यांपैकी सहा हजार 104 विद्यार्थी डिस्टींगन्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 

मंगळवेढा तालुक्‍याची बाजी 
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्‍यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या तालुक्‍याचा निकाल 97.30 टक्के इतका लागला आहे. या तालुक्‍यातून एक हजार 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी एक हजार 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur tops in Pune division in Class XII examination