

तात्या लांडगे
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘पीएच.डी.’पूर्व परीक्षा (पेट) ऑगस्टअखेर घेण्याचे निश्चित झाले आहे. विद्यापीठाची ही दहावी ‘पेट’ असणार आहे. यातून अंदाजे ३०० भावी संशोधकांना ‘पीएच.डी.’ करण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठाची ‘पेट’ ऑनलाइन होणार असून त्यासाठी ‘एआय’आधारित प्रॉक्टरिंग प्रणाली वापरली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून परीक्षार्थींच्या संशयास्पद हालचालींची स्वयंचलितपणे तपासणी केली जाणार आहे.
परीक्षेदरम्यानचा व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड केला जाणार आहे. परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना कॅमेरा आणि मायक्रोफोन सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे. यात ब्राउझर लॉक केला जाणार असून, त्यामुळे परीक्षेदरम्यान परीक्षार्थी त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर इतर कोणतीही वेबसाइट किंवा विंडो उघडू शकणार नाहीत. परीक्षेसाठी अर्ज केलेलाच विद्यार्थी परीक्षा देत आहे का, याची तपासणी करण्यासाठी ‘फेस रिकग्निशन’ प्रणालीही वापरली जाणार आहे.
तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थी स्क्रीनव्यतिरिक्त इतरत्र पाहत असल्यास किंवा काही वाचत असल्यास, ते ‘एआय’द्वारे ओळखले जाणार आहे. मागील वर्षीप्रमाणेच परीक्षेदरम्यान कोणी अनावश्यक हालचाल केल्यास किंवा नजर दुसरीकडे फिरविल्यास, तो उमेदवार परीक्षेतून आपोआप बाद होणार आहे. परीक्षा ऑनलाइन असल्याने जगभरातील कोणत्याही देशातून उमेदवार ‘पेट’ देऊ शकतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन
विद्यापीठातर्फे ‘पेट-१०’ ऑगस्ट महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. सध्या प्राध्यापकांकडे कार्यरत ‘पीएच.डी.’ उमेदवार किती आहेत, याची माहिती संकलित केली जात आहे. ‘पेट’ची नियमावली निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली जाणार आहे.
- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र-कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
प्राध्यापकांकडे ‘पीएच.डी.’चे आठ विद्यार्थी
शासनाच्या निकषांनुसार एका प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएच.डी.’चे आठ विद्यार्थी संशोधन पूर्ण करू शकतात. असोसिएट प्रोफेसरसाठी सहा, तर असिस्टंट प्रोफेसरसाठी ‘पीएच.डी.’च्या चार विद्यार्थ्यांची मर्यादा आहे. त्यानुसार, कोणत्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सध्या किती विद्यार्थी ‘पीएच.डी.’ करीत आहेत, याची माहिती विद्यापीठाकडून घेतली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.