जवान चंदू चव्हाण यांचा लष्कराचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

पाकिस्तानच्या तावडीतून सुटून सुखरूप भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांनी लष्कराचा राजीनामा दिला आहे. लष्करातील अधिकाऱयांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुटून सुखरूप भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांनी लष्कराचा राजीनामा दिला आहे. लष्करातील अधिकाऱयांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. चव्हाण यांनी राजीनामा डी.एम रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. चव्हाण यांनी म्हटले आहे की, 'पाकिस्तानमधून सुटून आल्यापासून सैन्य दलातील अनेकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मला चांगली वागणूक मिळत नव्हती. पाकिस्तानमधून आल्यापासून सतत शिक्षा दिली जात होती. शिक्षा केल्यामुळे खच्चीकरण होत होते. मला न्याय मिळतच नव्हता. या सर्व त्रासाला कंटाळून राजीनामा देत आहे. मला जर न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसणार आहे.'

दरम्यान, चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी आहेत. भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्यावर पाकिस्तानने त्यांना पकडले होते. पाकिस्तानच्या ताब्यात 3 महिने 21 दिवस होते. यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. सरकारने मोठे प्रयत्न करून त्यांना भारतात आणले होते. भारतात परतल्यानंतर देशवासीयांनी मोठा जल्लोष केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier chandu chavan resigned from indian army