विद्यापीठांनी काढला तोडगा..! अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनो 'असे' असेल तुमचे गुणपत्रक 

तात्या लांडगे
मंगळवार, 2 जून 2020

गुणांच्या शेजारीच दिले जातील ग्रेड 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना ग्रेड देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना वर्षभरातील इंटरनल ऍसेसमेंटवरुन 50 टक्‍के तर मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवरून 50 टक्‍के गुण दिले जातील. विद्यार्थ्यांच्या निकालपत्रावर गुणही असतील आणि त्याशेजारीच ग्रेड दिले जातील. दुसरीकडे अंतिम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले नाहीत, त्यांच्यासाठी मुदत दिली आहे. जुलैअखेर निकाल तर ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार व राज्यातील कोरोनाची स्थिती प पाहून 1 सप्टेंबरपासून महाविद्यालये सुरु करण्याचे नियोजन आहे. तर अंतिम वर्षातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा नेमक्‍या कधी व कशाप्रकारे घ्यायच्या याबाबत स्वतंत्र परिपत्रक निघेल. 
- डॉ. उध्दव भोसले, कुलगुरु, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड 

सोलापूर : राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांमधील साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुमारे नऊ लाख 87 हजार विद्यार्थ्यांना ग्रेड दिले जाणार आहेत. अपग्रेडेशनची संधी मिळणार असल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर ग्रेडची गुणपत्रिका स्पर्धेत टिकणार नाही, याची चिंता काहींना लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठांनी गुणांसोबतच ग्रेड देण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रथम व द्वितीय वर्षातील सुमारे 40 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने खूप प्रयत्न केले. मात्र, राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील भिती व संभ्रम दूर करीत परीक्षा रद्दचा निर्णय झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेसह अन्य काहींनी या निर्णयाला विरोध केला आहे. परंतु, बहूतांश विद्यार्थ्यांनी व्हॉट्‌सअपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो ठेवत निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, विद्यापीठांची नियमित निकाल पध्दती, संगणक स्वॉप्टवेअर व छपाई करुन ठेवलेल्या गुणपत्रिकांमुळे ग्रेड देण्यास व गुणपत्रिकांवर तसा बदल करणे डोकेदुखी आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना ग्रेडसोबत गुणही दिले जातील, असे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा यांनी सांगितले. 

 

बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांबाबत स्वतंत्र निर्णय 

अभियांत्रिकीसह विविध शाखांमध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचा कोणता कोणता विषय मागील सत्रात निघालेला नाही. त्यामुळे एक विषय गेलेला असो की चार-पाच विषयात अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी, त्यांना 2019-20 हे शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यासाठी सद्यस्थितीत 2021 ची (120 दिवस) वाट पहावी लागणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष तथा त्यांनी मुलाखत दिलेला जॉब गमवावा लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी त्यांची परिक्षा ऑनलाइन घेता येईल का, अथवा अन्य कोणता पर्याय काढता येईल का, याचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले आहे. या आठवड्यात बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्यस्तरीय समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

 

आगामी वर्षाचे नियोजन 
- परीक्षेचे अर्ज भरणे : 15 ते 25 जून 
- अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे : 30 जूनपर्यंत 
- परीक्षाचा निकाल : 30 जुलैपर्यंत 
- प्रवेश प्रक्रिया : 30 ऑगस्टपर्यंत 
- कॉलेज सुरु होणार : 1 सप्टेंबर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The solution drawn by the universities Final year students, your mark sheet will be