esakal | सरकारी शाळा आदर्श होण्यासाठी हवी गती
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी शाळा

सरकारी शाळा आदर्श होण्यासाठी हवी गती

sakal_logo
By
गजेंद्र बडे -सकाळ वृत्तसेवा

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण मिळावेआणि सरकारी शाळा या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तोडीच्या व्हाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय जाहीर करून वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र, यासाठी निवडण्यात आलेल्या शाळांना अद्यापही एका आवडीचासुद्धा निधी मिळू शकलेला नाही. राज्य सरकारने आदर्श शाळा करण्याची घोषणा करण्यात घाई केली. पण या घोषणेची अंमलबजावणी मात्र कासवगतीने होऊ लागली आहे.

हेही वाचा: कोरोनमुक्तांना मानसिक आजारांचा धोका?; पाहा व्हिडिओ

आदर्श शाळा ही संकल्पना मूळची पुणे जिल्हा परिषदेची आहे. २०१५ पासून पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी तीन, याप्रमाणे ३९ शाळा आदर्श केल्या जात आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने स्वनिधीतून या शाळांना ई-लर्निंग संच, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालय, डिजिटल टीव्ही संच, डिजिटल फळा (बोर्ड) आदी प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अध्यापन पद्धतीत अधिकाधिक डिजिटल पद्धतीचा अवलंब करणे आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थी हा शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञान वापरातही प्रगल्भ करणे, हा या आदर्श शाळा निर्माण करण्यामागचा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या या आदर्श शाळा उपक्रमामुळे सरकारी शाळांमधील शिक्षणाचा वाबळेवाडी पॅटर्न तयार झाला आहे. वाबळेवाडी ही पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेची शाळा आहे. आता ही शाळा आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून उदयास आली आहे. सध्या या सरकारी शाळेत प्रवेशासाठी दरवर्षी किमान ५०० विद्यार्थी वेटिंगवर (प्रतिक्षा यादी) असतात. शिक्षण अध्यापन आणि अध्ययन पद्धतीत सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे.

आंतरराष्ट्रीय शाळांचा उगम

वाबळेवाडी शाळेच्या शिक्षणाचा पॅटर्न पाहून, याच शाळेच्या धर्तीवर राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळा उभारण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला. या निर्णयामुळे वाबळेवाडी ही आंतरराष्ट्रीय शाळा झाली आहे. या बदलानंतर या शाळेला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. राज्यात सध्या अशा ८१ आंतरराष्ट्रीय सरकारी शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा म्हणून ओळखल्या जात आहेत.

हेही वाचा: युवती बनून दिल्लीच्या डॉक्टरला दोन कोटींचा घातला गंडा; पाहा व्हिडिओ

आदर्श शाळांना मिळणाऱ्या प्रमुख सुविधा

  • शाळेच्या प्रांगणातच अंगणवाडी केंद्र

  • विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात वर्गखोल्या बांधणे

  • सुसज्ज संगणकीय प्रयोगशाळा

  • इ-लर्निंग आणि डिजिटल फळा (बोर्ड)

  • मुला--मुलींसाठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे

  • व्हर्च्युअल क्लास रुम

  • पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय

  • प्रशस्त व सुसज्ज ग्रंथालय

  • स्वयंपाकगृह व भांडार कक्ष

  • खेळाचे साहित्य खरेदी

loading image
go to top