Positive Story: गावात एसटी आली आणि आजीनं हात जोडले !

st main.jpg
st main.jpg

मुंबई- प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटीची सेवा आता राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू झालीय. लॉकडाऊननं शहरीच नव्हे तर, ग्रामीण अर्थकारणाचंही कंबरडं मोडलं होतं. दूध, भाजीपाला, देशी अंडी घेऊन शहरात विक्रीसाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांचा एसटी अभावी उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशी महत्त्वाची एसटी गाडी गावात आल्यावर एखाद्या महिलेची काय प्रतिक्रिया असेल याचं एक बोलकं उदाहरण सध्या सोशल मीडियावर शेअर होतंय. एका आजीच्या व्हायरल फोटोमुळं एसटी आणि प्रवाशांचं नातं पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय. 

गोष्ट आहे. अमरावती जिल्ह्यातली. अमरावतीतल्या मोर्शी तालुक्यात खेड नावाचं गाव आहे. गाव अगदी 5 हजार लोकवस्तीचं. लॉकडाऊनच्या काळात गावात बाहेरचं कोणी सोडाच पण वर्तमानपत्रही मिळत नव्हतं. राज्यात अनेक गावं अशी आहेत. जिथं एसटीमधून वर्तमानपत्र पोहोच केली जातात. एसटी नसल्यामुळं जणू अशा गावांचा जगाशी संपर्कच तुटला होता. कारण, इंटरनेटनं जोडलं गेलेलं जग, केवळ स्मार्टफोन धारकांसाठीच आहे. हे या लॉकडाऊननं आपल्याला दाखवलंय. अशा परिस्थितीत पुन्हा एसटी सुरू करताना महामंडळानं गावागावात आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलं. सरपंच, नेतेमंडळी यांना सूचना देऊन एसटी पुन्हा सुरू होत असल्याची माहिती द्यायला सांगितली. जेणेकरून एसटी सेवेचा लाभ घेणाऱ्यांना याची माहिती मिळेल. 

मंगळवारी (13, ऑक्टोबर) अमरावती-खेड ही एसटी जवळपास सहा महिन्यांनंतर पहिल्यांदा धावली. अमरावतीतून पावणे सातवाजता सुटलेली ही गाडी सव्वा आठला खेड गावात पोहोचली. गावात एसटी येणार हे सगळ्यांना आधीच माहिती झालं होतं. एसटीनं अनेक वेळा प्रवास केलेल्या आजी, तिथं हजर झाल्या होत्या. एसटीला पुन्हा गावात पाहून त्यांनी हात जोडले. जवळच उभ्या असलेल्या कंडक्टर गोपाळ साहेबराव पवार यांनी आजींचा फोटो काढला. आज हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी या घटनेची माहिती ई-सकाळशी बोलताना दिली. आजीचं नाव अजूनही कळालेलं नाही. एसटी महामंडळाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला असून, अमरावतीतल्या खेड गावातल्या या आजी आज महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 

ग्रामीण भागाशी नाळ अजूनही घट्ट

एसटी महामंडळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर गेल्या २४ तासात उपरोक्त फोटो तब्बल ७५ हजार लोकांनी पाहिला असून, त्यापैकी ५ हजार लोकांनी तो लाईक केलेला आहे. तर ५००पेक्षा जास्त लोकांनी तो रिट्विट केला आहे. यातून एसटीची ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ किती घट्ट आहे हे दिसून येते.
- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com