लालपरीला ब्रँड अँम्बॅसॅडर' नेमण्याच्या हालचालींला आला वेग! मुख्यमंत्र्यांच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st mahamandal with eknath shinde

सर्वांच्या सुख-दु:खात साथ देणारी, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा कणा असणारी ग्रामीण भागाची लाडकी लालपरी अर्थात एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.

ST Mahamandal : लालपरीला ब्रँड अँम्बॅसॅडर' नेमण्याच्या हालचालींला आला वेग! मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील नुकतेच एसटी महामंडळाचा संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळासाठी "ब्रँड अँम्बॅसॅडर" नेमण्याचा सूचना केल्या आहे. त्यानंतर आता महामंडळ लालपरीसाठी एक नवीन 'ब्रँड अँम्बॅसॅडर' शोधण्याचा हालचालीला वेग आला आहे. एसटी महामंडळाने २००३ ला प्रथम 'ब्रँड अँम्बॅसॅडर' म्हणून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखेलें यांची नेमणूक केली होती. मात्र, एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभारानंतर राजीनामा दिला होता.

सर्वांच्या सुख-दु:खात साथ देणारी, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा कणा असणारी ग्रामीण भागाची लाडकी लालपरी अर्थात एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांना संपामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला झाला आहे. तसेच कोव्हीड पूर्वी राज्यभरात एसटीतून ६५ ते ७० लाख प्रवासी प्रवास करत होते; मात्र, आता कोरोनानंतर प्रवासी संख्याही २५ ते २८ लाख आहे. एसटी महामंडळाचे अडीच वर्षात जवळ जवळ ५० टक्के प्रवासी कमी झाले आहे. त्यामुळे एसटीकडे प्रवासी आकर्षित करण्यासाठी आणि महामंडळाचे महसूल वाढविण्यासाठी आता एसटी महामंडळाकडून 'ब्रँड अँम्बॅसॅडर' नेमण्याची हालचाली सुरू केली आहेत.

स्पर्धात्मक युगात एसटीची माहिती जनमानसात चांगल्या प्रकारे पोहचवायची असे आणि महसूल वाढवायचे असेल तर जाहिरात करणे अत्यंत गरजेचे आहे आणि हीच जाहिरात प्रभावीपणे करायची असेल तर महामंडळात 'ब्रँड अँम्बॅसॅडर' नेमावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या एसटी महामंडळाचा संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय आलेला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळासाठी "ब्रँड अँम्बॅसॅडर" नेमण्याचा सूचना महामंडळाला केल्या आहे. त्यानुसार आता एसटी महामंडळ "ब्रँड अँम्बॅसॅडर" नेमण्यासाठी तयारीला लागला आहे.

प्रतिक्रिया -

एसटीच्या सेवा सुविधा, माहिती जनमानसात प्रभावीपणे पोहचवण्यासाठी ब्रँड अँम्बॅसॅडर एसटीचा एक आरसा म्हणून काम नक्कीच करेल यात शंका नाही, पण ती व्यक्ती खऱ्या अर्थाने या लालपरीला ओळखणारी, तिच्याबद्दल आत्मीयता असणारी आणि तिच्यावर भरभरून प्रेम करणारी असायला हवीत. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे एसटीचे प्रथम ब्रँड अँम्बॅसॅडर होते. त्यांची प्रकृती लवकर बरे होवोत हीच प्रार्थना करतोय.

- रोहित धेंडे, अध्यक्ष - बस फॉर अस फाउंडेशन

एसटीचे पहिले ब्रँड अँम्बॅसॅडर विक्रम गोखले -

प्रवाश्यांशी जवळीक साधून जास्तीत जास्त माहिती प्रवासी वर्गात पोहचवण्यासाठी ब्रँड अँम्बॅसॅडर म्हणून ही जबाबदारी पेलण्याची विनंती एसटी महामंडळाने प्रसिद्ध चित्रपट नाट्य अभिनेते विक्रम गोखले यांना केली होती. २००३ साली विक्रम गोखले यांनी ती मान्य केली होती. २७ नोव्हेंबर २००३ रोजी जेष्ट अभिनेते विक्रम गोखले यांनी एसटीचे ब्रँड अँम्बॅसॅडर हे पद स्वीकारले होते. मात्र, वर्षभरात त्यांनी ब्रँड अँम्बॅसॅडर पदाचा राजीनामा दिला होता. सध्या जेष्ट अभिनेते विक्रम गोखले रुग्णालयात मृत्यूशी झुज देत आहे.