अबब...! दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी पावणेतीन कोटी लिटर दारू विक्री; एका वर्षात ३५ दिवस ‘ड्राय डे’, तरी विक्रीत दरवर्षी १० लाख लिटरची वाढ

दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी तब्बल पावणेतीन कोटी लिटर मद्यविक्री होते. २०२३-२४ साली दोन कोटी ६० लाख लिटर (अंदाजे २२०० कोटी रुपये) मद्यविक्री झाली होती. पुढे दोन वर्षांत मद्यविक्रीत १९ लाख लिटरची वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील नोंदीवरून समोर आले आहे.
दारू विक्री कमी

दारू विक्री कमी

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी तब्बल पावणेतीन कोटी लिटर मद्यविक्री होते. २०२३-२४ साली दोन कोटी ६० लाख लिटर (अंदाजे २२०० कोटी रुपये) मद्यविक्री झाली होती. पुढे दोन वर्षांत मद्यविक्रीत १९ लाख लिटरची वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील नोंदीवरून समोर आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात हातभट्टीचे प्रमाण देखील खूप जास्त आहे. दरवर्षी ग्रामीण पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवायांत तब्बल एक कोटी लिटरपेक्षा जास्त गूळमिश्रित रसायन, हातभट्टी नष्ट केली जाते. दुसरीकडे, अधिकृतपणे परवाने दिलेल्या देशी-विदेशी दारूच्या दुकानातून, वाईन शॉप, बिअर शॉपीतून देखील वर्षातील ११ महिन्यांत तब्बल सरासरी पावणेतीन कोटी लिटर मद्याची विक्री होते, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील आकडेवारीतून दिसते.

देशी दारूची किंमत प्रतिलिटर ४५० रुपये, विदेशी दारूची किंमत एक हजारांवर आहे. बिअरची किंमत ३०० रुपयांपर्यंत असून एक लिटर वाईन घ्यायला ५५० ते तीन हजारांहून अधिक रुपये मोजावे लागतात. परवानाधारक दुकानांतून सोलापूर जिल्ह्यात तब्बल २२०० कोटींची मद्यविक्री होत असल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. अनेक नवनवीन तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

वर्षात ३५ दिवस ‘ड्राय डे’, तरी...

सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी प्रजासत्ताक दिन, हुतात्मा दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती, आषाढी एकादशी, अनंत चतुर्दशी (प्रतिष्ठापना व विसर्जन), कार्तिकी एकादशी, माघवारी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (सुरवात व मिरवणुकीचा दिवस), दशमी, पौर्णिमा (चैत्र वारी), विजयादशमी, कोजागरी पौर्णिमा, हुलजंती यात्रा, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा, शिवजयंती, धुलिवंदन असे सरासरी ३० ते ३५ दिवस ‘ड्राय डे’ असतात. त्या दिवशी मद्यविक्रीस बंदी केली जाते. तरीदेखील, सोलापूर जिल्ह्यातील मद्यविक्री पावणेतीन कोटी लिटर होते, हे विशेष.

निवडणूक काळात सर्वाधिक विक्री

मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक झाली. डिसेंबर २०२५ मध्ये नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये महापालिकेची, तर फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. या काळात सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री वाढली होती.

  • वर्षनिहाय मद्यविक्री (लिटरमध्ये)
    (२०२३-२४)
    २,५९,७८,७६९ लिटर
    (२०२४-२५)
    २,७६,९६,४०० लिटर
    (२०२५-२६)
    २,७८,९१,३५२ लिटर
    (२०२६-२७)
    ५४.५० लाख लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com