पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच दूध संघाच्या थांबल्या निवडणूका 

प्रमोद बोडके
Saturday, 22 August 2020

राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूकांना, निवडणूक प्रक्रियेला 17 सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. 17 सप्टेंबरनंतर याबाबतच्या नवीन सूचना अपेक्षित आहेत. यापूर्वी राबविण्यात आलेली प्रक्रिया आता सुधारित पध्दतीने राबविली जाण्याची शक्‍यता आहे. 
- सुनील शिरापूरकर, विभागीय उपनिबंधक, दुग्ध 

सोलापूर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या उपाय योजनांमध्ये लॉकडाऊन ही महत्वाची उपाययोजना मानली जाते. लॉकडाऊनमुळे राज्यातील निवडणूकांचा विषय काही महिन्यांसाठी थांबला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग राज्य सरकारने काढला आहे. तर मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या विद्यमान संचालक मंडळांना मुदतवाढ दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच महत्वाच्या सहकारी दूध संघाच्या निवडणूका कोरोनामुळे रखडल्या आहेत. 

या पाच सहकारी दूध संघामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकूळ दूध), पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज दूध) आणि सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघ (दूध पंढरी) या महत्वाच्या तीन दूध संघांचा समावेश आहे. या तिन्ही दूध संघांचे कार्यक्षेत्र जवळपास संपूर्ण जिल्हाभर असल्याने स्थानिक राजकारणात या तीन दूध संघाच्या निवडणूका राजकियदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जातात. या शिवाय सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यातील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ व सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ (कृष्णा दूध) या दूध संघाच्याही निवडणूका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या आहेत. 

या पाचही दूध संघांच्या संचालक मंडळाची मुदत पूर्ण झाली आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिल्याने सोलापूर जिल्हा दूध संघाला संचालक मंडळाच्या निवडणूकीपूर्वी अध्यक्ष निवडीला सामोरे जावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stalled elections of five Dudh Sanghs in Western Maharashtra