स्टार्टअपसाठी लाभार्थ्यांचे बॅंकांमध्ये हेलपाटे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

सोलापूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रासाठी 2018-19 मध्ये 23 हजार 222 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. मात्र, व्यवसायासाठी कर्ज मिळेल या आशेने तब्बल एक लाख 39 हजार 272 जणांनी बॅंकांकडे अर्ज केले. मात्र, त्यापैकी पाच हजार 263 जणांनाच लाभ मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. देशातील सुशिक्षित मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्या संशोधनाला वाव मिळावा, या उद्देशाने केंद्राने स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली. अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी स्टार्टअपसाठी बॅंकांत हेलपाटे मारले; परंतु योजनेच्या लाभाची त्यांना प्रतीक्षाच आहे. मागील वर्षांत या योजनेंतर्गत चार हजार 532 तरुणींना, तर एससी व एसटी प्रर्वगातील 994 जणांनाच लाभ मिळाला आहे. त्यामध्ये गडचिरोली, हिंगोली, नंदुरबार, परभणी, गोंदिया, वाशीम या सहा जिल्ह्यांत फक्‍त 52 जणांनाच लाभ मिळाला आहे, तर नगरमध्ये 125, अकोल्यात 48, औरंगाबादमध्ये 18, अमरावती 90, बीड 23, भंडारा 35, चंद्रपूर 58, धुळे 24, जळगाव 87, जालना 42, कोल्हापूर 248, लातूर 44, मुंबई शहर एक हजार 268, मुंबई 187, नागपूर 432, नांदेड 55, नाशिक 155, उस्मानाबाद 44, पालघर 17, पुणे 774, रायगड 122, रत्नागिरी 136, सांगली 97, सातारा 63, सिंधुदुर्ग 88, सोलापूर 147, ठाणे 454, वर्धा 46 आणि यवतमाळमध्ये 34 लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध झाले आहे. 

राज्याची सद्यःस्थिती 
उद्दिष्ट  - 23,222 
अर्जदार  - 1.39 लाख 
लाभार्थी  - 5,263 
रक्‍कम वितरीत  - 621.42 कोटी 

स्टॅंडअप इंडिया योजनेंतर्गत हजारो अर्ज प्राप्त झाले; परंतु निकषांनुसार सोलापूर जिल्ह्यातील 147 जणांना लाभ दिला आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती व्हावी म्हणून आता महाविद्यालय स्तरावर मेळावे घेतले जातील. 
- आर. डी. चंदनशिवे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Startup India scheme