बातमी! राज्य सहकारी बॅंकेला 325 कोटींचा निव्वळ नफा; प्रति कर्मचारी व्यवसाय 43 कोटींवर 

तात्या लांडगे
Monday, 22 June 2020

ठळक बाबी... 

  • 31 मार्च 2020 अखेर राज्य सहकारी बॅंकेला एक हजार 345 कोटींचा ढोबळ नफा 
  • ऑपरेटिंग प्रॉफीट 758 कोटी तर विविध तरतुदीनंतर झाला सव्वातीनशे कोटींचा नफा 
  • सात वर्षांपासून बॅंक 'अ' वर्गात; सहा वर्षांपासून दिला जातोय सभासदांना 10 टक्‍के लाभांश 
  • बॅंकेचा एनपीए शून्य; 109 कोटींच्या इतिहासात बॅंकेचे मोठे यश 
  • अनुत्पादित कर्जासाठी 100 टक्‍के तरतूद केल्याने अनुत्पादित कर्जाचे निव्वळ प्रमाण शून्यावर 

सोलापूर : रिझर्व्ह बॅंकेने 7 मे 2011 रोजी राज्य सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्‍ती केली. त्यावेळी बॅंकेला एक हजार 69 कोटींचा तोटा होता. त्यातून मार्गक्रमण करीत बॅंक आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. 31 मार्च 2020 अखेर बॅंकेला एक हजार 345 कोटींचा ढोबळ नफा झाला असून 325 कोटींचा निव्वळ नफा झाल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. 

आरबीआयच्या निकषांपेक्षा बॅंकेचे भांडवल 13.11 टक्‍क्‍यांनी अधिक झाले आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय 2018 च्या तुलनेत वाढला असून तो आता 43 कोटींवर पोहचला आहे. बॅंकेचे सभासद, कर्मचाऱ्यांच्या विश्‍वासामुळे व परिश्रमामुळे बॅंकेला मोठे यश प्राप्त झाल्याचे बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. बॅंकेने 109 वर्षांत प्रथमच मोठे यश मिळवल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. बॅंकेने आपले कार्यक्षेत्र कारखान्यापुरतेच मर्यादित न ठेवता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, पतसंस्था, हौसिंग सोसायट्यांसह अन्य सहकारी संस्थांना कर्जपुरवठा केला. त्यांनी कर्जदारांनी कर्जाची नियमित परतफेड केल्याने बॅंक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. आर. देशमुख यांनी सांगितले. 

बॅंकेने सुरु केली 'आत्मनिर्भर' योजना 
कर्जदाराच्या एकूण येणे कर्जाच्या 25 टक्‍के रक्‍कम संबंधित कर्जदारास एक वर्षाच्या सवलतीच्या कालावधीसह पुढील पाच वर्षाच्या मुदतीने फेडण्याची सवलत दिली आहे. अडचणीतील उद्योगांसाठीही बॅंकेने कर्ज पुनर्बांधणी योजना जाहीर केली आहे. 

ठळक बाबी... 

  • 31 मार्च 2020 अखेर राज्य सहकारी बॅंकेला एक हजार 345 कोटींचा ढोबळ नफा 
  • ऑपरेटिंग प्रॉफीट 758 कोटी तर विविध तरतुदीनंतर झाला सव्वातीनशे कोटींचा नफा 
  • सात वर्षांपासून बॅंक 'अ' वर्गात; सहा वर्षांपासून दिला जातोय सभासदांना 10 टक्‍के लाभांश 
  • बॅंकेचा एनपीए शून्य; 109 कोटींच्या इतिहासात बॅंकेचे मोठे यश 
  • अनुत्पादित कर्जासाठी 100 टक्‍के तरतूद केल्याने अनुत्पादित कर्जाचे निव्वळ प्रमाण शून्यावर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Co-operative Bank has a net profit of Rs 325 crore