राज्यातील कृषी पदविका, तंत्र निकेतनची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैत होणार होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला.

पुणे - राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. 

राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची बैठक शुक्रवारी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, परिषदेचे महासंचालक विश्‍वजित माने, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह कृषी परिषदेचे संचालक उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

नाशिक जिल्ह्यातील काष्टी येथे कृषी व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला. राहुरी कृषी विद्यापीठाच्याअंतर्गत हे महाविद्यालय सुरू होणार आहे. तसेच, भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार साकोलीमध्ये कृषी महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाला आज मंजुरी दिली.अकोला कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृषी राज्यमंत्री कदम म्हणाले, राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैत होणार होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन करून तसेच गेल्या दोन वर्षांतील गुणांची सरासरी विचारात घेऊन उत्तीर्ण केले जाईल. याचा फायदा राज्यातील 230 कृषी विद्यालयातील दहा हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Diploma in Agriculture final year examination canceled