महापालिकांच्या प्रभागांमध्ये अदलाबदल

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यातील विविध महापालिका प्रशासनाने संबंधित पालिकेबाबतचा प्रारूप आराखडा जाहीर
Election voting
Election votingSAKAL

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यातील विविध महापालिका प्रशासनाने संबंधित पालिकेबाबतचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. नव्या रचनेमुळे काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना तर काही ठिकाणी विरोधकांनी फायदा होणार असल्याची चर्चा आहे. राज्यातील महापालिकांमध्ये नेमके काय बदल झाले, त्याबाबत...

मुंबई महापालिका

मुंबईत शिवसेनेला फायदा

आगामी मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने आज प्रभाग रचना जाहीर केली. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ म्हणजे नऊने वाढली आहे. नऊपैकी सहा प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहेत, तर दोन प्रभागात भाजप वरचढ आहे. शहर, पूर्व उपनगर आणि पश्‍चिम उपनगरमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग वाढले आहेत.

  • नव्या प्रभाग रचनेनुसार दहिसर-मागाठाणे (आर उत्तर ), कांदिवली (आर दक्षिण), जोगेश्‍वरी-अंधेरी पूर्व (के- पूर्व), कुर्ला (एल), घाटकोपर (एन), चेंबूर (एम पश्‍चिम) लालबाग-परळ (एफ दक्षिण ), वरळी प्रभादेवी (जी दक्षिण ), भायखळा (ई) या ठिकाणी प्रत्येकी एक प्रभाग वाढला.

  • आर उत्तर, के पूर्व, एल, एन, एफ दक्षिण, जी दक्षिण या सहा प्रभागांमध्ये शिवसेनेची नगरसेवक संख्या अधिक आहे.

  • आर दक्षिण, एम पश्‍चिम या दोन प्रभागात भाजपचे वर्चस्व आहे.

  • ई प्रभागात संमिश्र परिस्थिती आहे.

ठाणे महापालिका

ठाणे पालिकेत ‘समतोल’

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर केला. त्यानुसार ठाणे शहरात पाच तर उपशहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळवा, मुंब्रा सहा अशा एकूण ११ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्याचा फायदा शिवसेना, राष्ट्रवादीला होणार असल्याचे चित्र आहे. प्रभाग रचनेच्या आराखड्यात पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाने योग्य तो समतोल साधल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

  • २०१७ साली घोडबंदर २०, वागळे कोपरी ३२, वर्तकनगर १२, ठाणे शहर १२ तर जुन्या ठाण्यात आठ असे एकूण ८४ नगरसेवक होते. त्यात आता पाच नगरसेवकांची वाढ होणार आहे.

  • विशेष म्हणजे त्यातील काही नगरसेवक हे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात आहेत. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा- मुंब्य्रातून सहा जादा नगरसेवक निवडून येणार आहे.

  • त्यामुळे प्रभाग रचना आखताना पालिका प्रशासनाने व निवडणूक आयोगाने कमालीचा ‘समतोल’ राखला असल्याची चर्चा ठाण्यात आहे.

नवी मुंबई

नवी मुंबईत शिवसेनेला फायदा?

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना आज जाहीर झाली. महापालिकेत प्रथमच पॅनल पद्धतीने ४१ प्रभागांत १२२ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. नव्या प्रभागरचनेत ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघापैकी ऐरोली मतदारसंघात सर्वाधिक प्रभाग आहेत. हे बहुतांश प्रभाग शिवसेनेला पोषक असल्याने या प्रभागरचनांचा फायदा शिवसेनेला होण्याची दाट शक्यता आहे.

  • नवी मुंबई महापालिकेवर २५ वर्षांपासून माजी मंत्री गणेश नाईक यांच्या गटाची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्याने काही काळ पालिकेवर भाजपची सत्ता होती.

  • गणेश नाईकांना मानणारे बहुतांश नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. काही नगरसेवक राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळे पॅनेल पद्धतीचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.

  • पॅनेल पद्धतींमुळे अपक्ष नगरसेवकांवर गंडांतर निर्माण झाले आहे.

सोलापूर

भाजपचा ७० प्लसचा दावा

निवडणूक आयोगाच्या आदेशाने मंगळवारी जाहीर झालेल्या प्रारुप प्रभाग रचना ही महाविकास आघाडीला पूरक असली तरी सत्ताधारी भाजपने ७० प्लसचा दावा केला आहे. परंतु ही प्रभाग रचना कोणाला तारक अन्‌ कोणाला मारक ठरणार हा येणारा काळच ठरवणार आहे. महाआघाडी सरकारने महापालिकेतील राजकीय समीकरण बदलण्यासाठी केलेली प्रभाग रचना ही सर्वपक्षीयांनी पूरक असल्याचे सांगत बहुमताने येण्याचा दावा केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

  • सन २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभाग रचनेमध्ये २५ टक्‍क्‍यांचा बदल झाला आहे. मागील निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग होता. यंदा तीन सदस्यांचा प्रभाग झाला आहे. प्रभागाची झालेली ही तोडफोड विद्यमान नगरसेवकांसाठी संमिश्र आनंदचा ठरला आहे.

  • महापौर उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, माजी सभागृहनेते यांच्या सध्याच्या प्रभागावर या नव्या रचनेचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.

  • महापालिका निवडणुकीची मंगळवारी प्रभाग रचना जाहीर होताच ३० हजार लोकांनी ऑनलाईनवर प्रभाग रचना पाहिली.

पिंपरी-चिंचवड

बहुतांश प्रभाग ‘जैसे थे’

बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा राज्य निवडणूक आयोगाने अखेर मंगळवारी (ता. १) जाहीर केला. मात्र, बहुतांश प्रभाग ‘जैसे थे’ असून, मोठ्या प्रभागाचे दोन भागात विभाजन केले आहे. काही भाग नजीकच्या प्रभागात जोडला गेला आहे. सध्या स्थितीत विद्यमान महापौर उषा ढोरे यांचे निवासस्थान शेवटच्या व सदस्येने आणि लोकसंख्येने सर्वात मोठ्या जुनी सांगवी प्रभागात आहे. सर्वाधिक पाच प्रभाग भोसरी परिसरात असून त्यात प्रभाग सात, आठ, नऊ, दहा व अकरा या क्रमांकाच्या प्रभागांचा समावेश आहे.

  • महापालिकेत १९९८ मध्ये समाविष्ट झालेल्या १८ गावांमध्ये १५ प्रभाग असून त्यात प्रभाग एक ते सहा, १२, १३, २४, ३४ ते ३९ यांचा समावेश आहे. म्हणजेच समाविष्ट गावांचे नेतृत्व ४५ नगरसेवक करणार आहेत.

  • तीन सदस्यांचा सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक एक हा तळवडे, प्रभाग क्रमांक ३७ ताथवडे, पुनावळे हा सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग ठरला आहे.

  • विधानसभा मतदारसंघनिहाय भोसरीत १५, पिंपरीत १३, चिंचवडमध्ये १८ प्रभागांचा समावेश आहे.

नागपूर

नागपुरात ‘कहीं खुशी, कहीं गम’

महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप आराखड्यामुळे काहींना धक्का बसला; तर काही नगरसेवकांना आनंददायी ठरला. १५६ सदस्यांसाठी ५२ प्रभागांच्या या आराखड्यात सद्यस्थितीतील प्रभागाचा बराच भाग कापण्यात आला असला, तरी त्यापूर्वीचा भाग जोडण्यात आला. याशिवाय सद्यस्थितीतील काही नगरसेवकांचा मताधिक्य असलेला भाग दुसऱ्याच प्रभागाला जोडण्यात आल्याने त्यांच्यात नैराश्य दिसून आले.

  • प्रारूप आराखडा घोषित करण्यात आल्याने नगरसेवक, राजकीय पक्षांतील इच्छुकांना नागरिकांची भेट घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

  • अनेकांनी आराखडा बघितल्यानंतर नव्या प्रभागातील कार्यकर्त्यांना सायंकाळीच एकत्र येण्याचे आवाहन केले.

  • काहींनी परिसराचे आराखडे तयार करण्यास सुरुवात केली. प्रभागाच्या प्रारूप आराखड्याने भाजप व काँग्रेसमध्येही उत्साह दिसून येत आहे.

अकोला

अकोल्यात लढाई अटीतटीची

अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आला. २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रारूप तयार करण्यात आले. तीन यंदाच्या निवडणुकीसाठी पालिकेतील सदस्यसंख्या ८० वरून ९१ झाली आणि प्रभागांची संख्या २० वरून ३० झाली. त्यामुळे ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी, भाजप, कॉंग्रेस यांच्यासाठी चांगलीच अटीतटीची होणार आहे.

  • नव्या प्रारुप आराखड्यानुसार अकोट फैल परिसरातील प्रभाग क्रमांक तीन हा सर्वांत कमी लोकसंख्येचा प्रभाग ठरला आहे.

  • शहरातील एकूण जागांपैकी १५ जागा अनुसूचित जातीसाठी, दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे.

कोल्हापूर

मातब्बरांना आव्हानात्मक

महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाला. बदललेल्या प्रभाग रचनेमुळे काही मातब्बरांना निवडणूक आव्हानात्मक झाली आहे. प्रभागांचा आकार विस्तारल्याने अपक्षांना निवडणूक अवघड आहे. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहे.

  • कोल्हापूर महापालिकेत पूर्वी ८१ सदस्य होते. आता ही संख्या ९२ झाली आहे, तर प्रभागांची संख्या ३१ झाली आहे.

  • बदललेल्या प्रभाग रचनेमुळे काही मात्तबरांना निवडणूक पूर्वीच्या तुलनेत अवघड झाली आहे. महापालिकेची निवडणूक ही आता पक्ष पातळीवरच लढवली जाईल, अशी चिन्हे आहेत.

नाशिक

विद्यमान सदस्य सुरक्षित

नाशिक महापालिकेच्या सध्याच्या १२२ नगरसेवकांच्या ३३ प्रभागांच्या जागी आज जाहीर झालेल्या प्रारुप प्रभाग रचनेत १३३ नगरसेवकांसाठीच्या ४४ प्रभागांचा समावेश आहे. प्रभाग आठमध्ये चार आणि उर्वरित ४३ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक असतील. प्रारुप प्रभाग रचनेसाठी २०११ मधील जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. ३० ते ३५ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे.

  • प्रभाग ३ भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा. सर्वाधिक ४१ हजार ५८५ लोकसंख्या

  • सिडकोमधील प्रभाग ३७ भौगोलिकदृष्ट्या सर्वात लहान

  • प्रभाग ४० मध्ये सर्वात कमी २९ हजार ९३८ लोकसंख्या

  • विद्यमान नगरसेवक सुरक्षित, इच्छुकांनाही संधी

  • नव्या प्रभाग रचनेत काहीत मोडतोड, तर काही अतिसुरक्षित

अमरावती

अमरावतीत पक्षीय चुरस

अमरावती महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप आराखडा मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आला. २०११ च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेल्या या आराखड्यामध्ये ३२ प्रभाग तीन सदस्यीय, तर एक प्रभाग दोन सदस्यीय असणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपमध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. त्यानिमित्त राजकीय पक्षांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

  • बदलत्या प्रभागरचनेमुळे अमरावती महापालिकेतील प्रभागांची संख्या २३ वरून ३३ झाली आहे. परिणामी सदस्यसंख्या ८७ वरून ९८ वर पोहोचली.

  • शहरातील प्रभागांवर नजर टाकल्यास बडनेरा उपनगरातील आठवडी बाजार हा सर्वांत कमी लोकसंख्येचा प्रभाग ठरला आहे.

  • अनुसूचित जातीसाठी, दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com