मनसेचा झेंडा वादात; निवडणूक आयोगाची नोटीस

सकाळ वृत्तसंस्था
Thursday, 13 February 2020

मनसेनं आपल्या नव्या झेंड्यावर छापलेली स्वराज्याच्या राजमुद्रेची प्रतिमा त्वरीत हटवावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मुंबई : शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला कारणा दाखवा नोटीस पाठवली आहे.

राज्य निवडणूक आयोगने मनसेना लिखित स्वरुपात ही नोटीस पाठवली असून यामध्ये त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीवरुन पक्षावर कारवाई क करु नये? याबाबत विचारले आहे. संभाजी ब्रिेगेड आणि मराठा महासंघाने याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या.

नक्की वाचा : लई भारी ! विद्यार्थ्यांनी दोन लाख परत केले

मनसेनं आपल्या नव्या झेंड्यावर छापलेली स्वराज्याच्या राजमुद्रेची प्रतिमा त्वरीत हटवावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच जर मनसेनं ही राजमुद्रेची प्रतिमा हटवली नाही तर संभाजी ब्रिगेड मनसेविरोधात आपल्या स्टाईलनं रस्त्यावर उतरेल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला होता.

महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अलीकडंच झालेल्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात आपली राजकीय भूमिका बदलली. त्याची सुरुवात पक्षाचा झेंडा बदलून झाली. यापूर्वीचा चौरंगी झेंडा बदलून त्याजागी संपूर्णपणे भगवा ध्वज स्वीकारण्यात आला आहे. या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा आहे. त्यास राज्यातील काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. तसंच, निवडणूक आयोगाकडं तक्रारही केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आयोगानं मनसेला पत्र पाठवलं आहे. संघटनांच्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करा, असं आयोगानं मनसेला बजावलं आहे.

वाचा : Video : जेसीबीच्या साहाय्याने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट!

असा झाला रंगबदल- मनसेच्या स्थापनेच्या वेळी राज ठाकरे यांनी सर्वसमावेशक भूमिका घेताना झेंड्यामध्ये विविध रंग ठेवले होते. त्यात निळ्या, हिरव्या, भगव्या व पांढऱ्या रंगाचा समावेश होता. कालांतरानं मनसेनं सर्वसमावेशक भूमिकेत बदल करत मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. मात्र, झेंड्याचा रंग कायम होता. मात्र राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर मनसेनं पुन्हा नवी भूमिका घेतली आहे. मराठी व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीचा हात धरला आहे. काँग्रेससोबत सत्तेत असल्यामुळं हिंदुत्व व मराठीची भूमिका घेताना शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे. हेच लक्षात घेऊन मनसे मराठीबरोबर हिंदुत्वाची कास धरली आहे. नवा झेंडा हा त्याचंच प्रतीक मानला जात आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state election commission sent notice to mns on a complaint filed against partys new flag