Video : जेसीबीच्या साहाय्याने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट!

MP-Shivaji-Maharaj-Statue
MP-Shivaji-Maharaj-Statue

छिंदवाडा : मध्य प्रदेशच्या छिंदवाडा भागातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थानिक प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने हटवल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून शिवप्रेमींमध्येही संतापाची लाट उसळली आहे. 

याची दखल घेत काही हिंदुत्ववादी संघटनांनी छिंदवाडा-नागपूर हायवे वर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. छत्रपती शिवरायांची मूर्ती हटविल्याचा निषेध व्यक्त करत परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. 

सदर घटना छिंदवाडा परिसरातील मोहगाव चौकात घडली आहे. येथील शासनाच्या ताब्यातील जमिनीवर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र, पुतळा बसवण्यापूर्वी कोणत्याही परवाणग्या घेण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे २४ तासातच ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. 

नाराज झालेल्या शिवप्रेमींनी सरकारची ही कृती जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याविरोधात छिंदवाडामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात येईल, असे प्रशासनाने आश्वासन दिल्यावर शिवप्रेमींनी आंदोलन थांबवले. 

भाजपचा शिवसेनेला टोला

सध्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असून महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसह सत्तेत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवरून शेअर करत सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने पुतळा हटवून महाराजांबद्दलचे 'प्रेम' दाखवले असून शिवसेनेची आता वेळ आली आहे. सेनेला महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? असा खडा सवालही भाजपने उपस्थित केला आहे.

शिवराजसिंह चौहानांचे टीकास्त्र 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचा गौरव असून, देशाचे प्रेरणास्त्रोतही आहेत. त्यामुळे त्यांचा अपमान अजिबात सहन करणार नाही.

जर कोणाला आक्षेप होता, तर सन्मानपूर्वक मार्गाने ही मूर्ती हटवायला हवी होती, पण मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करण्यामध्ये धन्यता वाटत आहे,' असा आरोप चौहान यांनी स्थानिक सरकारवर केला आहे. तसेच छत्रपतींचा अपमान महाराष्ट्रात काँग्रेससह सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com