राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

state government immediately declare wet drought congress Nana Patole

राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा : नाना पटोले

मुंबई : ‘‘अतिवृष्टीने झालेल्या शेतमालाच्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘‘यावर्षी विदर्भ, मराठावड्यासह काही भागात अतिवृष्टी झाली. त्यात शेतातील उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कपाशी, तूर, मका, बाजरी हातातून गेली. फळबागा आणि पालेभाज्यांनाही या पावसाचा फटका बसला. पशुधनाचेही नुकसान झाले.

राज्य सरकारने मंत्रालयात बसून पंचनामे करण्याचे आदेश दिले. पण स्थानिक पातळीवर प्रशासन कामच करत नसल्याचे चित्र आहे,’’ असा दावा पटोले यांनी केला. राज्य सरकारने तातडीने हालचाली करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्ती ओढवताच तत्काळ दहा हजार रुपयांची रोख मदत दिली आणि नंतर दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. होते. अटी, शर्ती, नियमांचे अडथळे निर्माण करून शेतकऱ्याला ऑनलाइनच्या रांगेत दिवसरात्र उभे केले नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. पण भाजप सरकार हे शेतकरीविरोधी असल्याने मदतीसाठी हात आखडताच घेतला जातो, अशी टीका त्यांनी केली.

‘रस्त्यावर फिरू देणार नाही’

शिंदे-फडणवीस सरकारला त्यांच्यातील भांडणातूनच वेळ मिळत नाही. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून सरकारने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.