महापालिकेला प्रभाग तीनचा की चारचा यावरून संभ्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Election Commission

राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी आता पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

Municipal Election Ward Structure : महापालिकेला प्रभाग तीनचा की चारचा यावरून संभ्रम

पुणे - राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी आता पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शासनाने दिलेल्या पत्रांच्या संदर्भानुसार शहरात १६६ नगरसेवक असणार हे निश्‍चित आहे. पण यासाठी प्रभाग तीनचा असणार की चारचा याबाबत प्रशासनच गोंधळात पडले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून पुढील स्पष्टीकरणाची वाट पाहिली जाणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून महापालिकेच्या प्रभाग रचनेचा गोंधळ सुरू आहे. सुरवातीला राज्य सरकारने पुण्यात एकचा सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडीत यावरून मतभिन्नता समोर आल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी त्यातून मार्ग काढत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे महापालिकेने ५७ प्रभाग तीन सदस्यांचे तयार केले. तर एक प्रभाग दोन सदस्यांचा केला.

ही प्रभाग रचना व आरक्षणीत जागा अंतिम झाली. त्यामुळे निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्यात सत्तापरिवर्तन होताच शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकेच्या निवडणूका २०१७ प्रमाणे होतील असे जाहीर केले. महापालिकांमध्ये नगरसेवकांची वाढविलेली संख्या कमी केली. त्यानुसार पुणे महापालिकेत १७३ ऐवजी १६६ नगरसेवक असणार आहेत. पण यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांमुळे पुढे काहीही झाले नाही. आता २८ नोव्हेंबर रोजी याच विषयावर सुनावणी होणार असताना राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करा असे आदेश दिले आहेत.

असा आहे संभ्रम

शिंदे फडणवीस सरकारने २०१७ प्रमाणे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चारचा प्रभाग होणार असे सांगितले गेले. पण तसा आदेश अद्याप महापालिकांना दिला गेला नाही. तर दुसरीकडे १७ जानेवारी २०२२ रोजीच्या राजपत्रात '‘प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तिथवर तीन पालिका सदस्य परंतु, दोनपेक्षा कमी नाही व चारपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील’’ असे नमूद केले आहे. या राजपत्रानुसार तीन सदस्यांच्या प्रभागांची संख्या जास्त असावी असे सूचीत केले आहे. हे राजपत्र अद्यापही रद्द केलेले नाही. त्यामुळे नवी प्रभाग रचना कशी करावी याचा संभ्रम आहे.

‘महापालिकेला पत्र नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करावी असे पत्र पाठवले आहे. पण किती सदस्यांचा प्रभाग असावा हे निश्‍चीत नाही. त्यामुळे पुढील आदेशानंतर कार्यवाही सुरू होईल.’

- अजित देशमुख, उपायुक्त, निवडणूक शाखा

‘महापालिका निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगासोबत आॅनलाइन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये प्रभाग रचनेबाबत काय करायचे आहे याबाबत स्पष्‍टता आणली जाईल.’

- विक्रम कुमार, आयुक्त

प्रभाग रचनेची संभाव्य आकडेमोड

राज्य सरकारने १७३ ऐवजी १६६ नगरसेवक संख्या निश्‍चीत केली आहे. तीन सदस्यांचे प्रभाग झाल्यास तीन प्रभाग कमी होणार आहेत. यामध्ये ५५ प्रभाग तीन सदस्यांचे आणि १ प्रभाग चार सदस्यांचा असू शकतो. तर चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास ४ सदस्यांचे ४१ प्रभाग आणि एक प्रभाग २ सदस्यांचा होऊ शकतो. किंवा ४ सदस्यांचे ४० प्रभाग आणि दोन प्रभाग तीन सदस्यांचे होऊ शकतात.

महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचे आकडे

- निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार

- ३५.५६ लाख इतकी लोकसंख्या आधार मानून प्रभाग रचना होणार

- अनुसूचित जातीची लोकसंख्या ४.८० लाख असणार

- अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४१, ५६१ असणार

- चार सदस्यसाठी प्रभागाची सरासरी लोकसंख्या ८५७०८ असेल

- तीन सदस्य प्रभागासाठी सरासरी लोकसंख्या ६४,२८१ असेल

- ही संख्या १० टक्के कमी जास्त हो शकते.