महामारीत ही राज्याचा आरोग्य विभाग सलाईनवर, भरती प्रक्रियेचे लाखो अर्ज पडून

मिलिंद तांबे
Friday, 16 October 2020

सध्या राज्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांसह 29 हजारांहून पदे रिकामी आहेत. कर्मचाऱ्यांच्या समस्यांसोबत याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे. मात्र भरती प्रक्रियेसाठी लाखो अर्ज आले असून देखील अनेक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया लांबली आहे.

मुंबई: राज्यात गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लालफितीत अजकली असल्याने अपुर्ण संख्याबळात कर्मचा-यांना कोरोना सोबत दोन हात करावे लागत  आहेत. सध्या राज्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांसह 29 हजारांहून पदे रिकामी आहेत. कर्मचाऱ्यांच्या समस्यांसोबत याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे. मात्र भरती प्रक्रियेसाठी लाखो अर्ज आले असून देखील अनेक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया लांबली आहे.

सध्या सुमारे 29 हजारांहून आरोग्यसेवी कर्मचाऱ्यांची पदे भरणं गरजेचे होते. तर  कोरोनाकाळासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 19 हजार 752 पदे तात्काळ भरण्याचा निर्णय झाला मात्र अजूनही 12,574 पदे भरलेली नसल्याची माहिती मिळत आहे. कोरोना काळात सरकारने नाईलाजाने कंत्राटी पद्धतीने काही पदं भरण्याचा प्रयत्न केला मात्र ही भरती तूतपूंजी आहे. 

राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोठ्या संख्येने रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले असून अतिदक्षता विभागात खाटा मिळणे हे एक आव्हान बनले आहे. मुंबई, पुणे, नाशिक सातारा कोल्हापूर सारख्या ठिकाणी रुग्ण वाढत असल्याने रुग्ण आणि रुग्णालयातील खाटांची संख्या याचे प्रमाण व्यस्त बनत असतानाच डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची हजारो पदे भरलीच जात नाहीत.

आरोग्य विभागात 29 हजारांहून जास्त पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाच्या अखत्यारीत 56,560 नियमित मंजूर पदे आहेत त्यापैकी 17,337 पदे गेल्या अनेक वर्षांत भरण्यात आलेली नाहीत. सहसंचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक यांची 850 पदे रिक्त आहेत.

अधिक वाचाः  पोस्ट कोविड OPD मध्ये पल्मनरी फायब्रोसिसचे वाढते रुग्ण, उपचारानंतरही अशक्तपणा

सरकारचा हा वेळकाढूपणा आहे. यामुळे बाकी कर्मचा-यांना दबावात काम करावे लागतंय. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये मधूमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार यांसारखे आजार बळावू लागले आहेत असे महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अरूण खरमाटे यांनी सांगितले. सरकारने घोषणा करून देखील ही भरती प्रक्रिया काही ना काही कारणं देत पुढे ढकलली. मात्र दुस-या बाजूला काही एजंसीच्या माध्यमातून कंत्राटी कामगार भरती केले जात आहेत. सरकार भरती प्रक्रिया राबवण्यात कमी पडत असल्याचे दिसत असून सरकारकडे योग्य धोरणाचा अभाव असल्याचे ते पुढे म्हणाले. याबाबत आम्ही मुंख्यमंत्र्यापासून आरोग्य मंत्र्यांपर्यंत सर्वांशी पत्र व्यवहार करून विविध विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करत असलेल्या कामगारांना संधी देण्याची मागणी केली आहे, मात्र त्याकडे ही दुर्लक्ष कऱण्यात आले असल्याचे ही भरमाटे पुढे म्हणाले. 
 
जिल्ह्यानिहाय रिक्त पदे

पुणे जिल्ह्यातील पुणे, सोलापूर आणि सातारासाठी 2479 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 911 रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1793 मंजूर पदे असून 923 पदे भरलेली नाहीत. ठाणे जिल्ह्यासाठी 1889 पदे मंजूर असून 1494 पदे भरली नाहीत. औरंगाबाद 2436 पदांपैकी 1461 रिक्त पदे तर नाशिक जिल्ह्यासाठी 2330 मंजूर पदे असताना 1165 पदे  रिक्त आहेत.  

सरकारसमोरील अडचणी

भरती प्रक्रियेसाठी लाखो अर्ज आलेले आहेत. मात्र निवडणूक आचार संहिता, सारथी पोर्टल, मराठा आरक्षण आणि सध्या कोरोना या अडचणी सरकारसमोर उभ्या ठाकल्या असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

-------------------------

(संकलन- पूजा विचारे)

state health department millions of applications recruitment process falling


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state health department millions of applications recruitment process falling