पोस्ट कोविड OPD मध्ये पल्मनरी फायब्रोसिसचे वाढते रुग्ण, उपचारानंतरही अशक्तपणा

पोस्ट कोविड OPD मध्ये पल्मनरी फायब्रोसिसचे वाढते रुग्ण, उपचारानंतरही अशक्तपणा

मुंबई: कोरोना संक्रमणावेळी सर्वाधिक नुकसान हे श्वसनतंत्र आणि फुफ्फुसांना पोहोचते. फुफ्फुसातील उतींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतात. ज्याचा परिणाम म्हणून व्यक्ती योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. ज्या रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवले आहे आणि ज्या रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे, अशा रुग्णांमध्ये पल्मनरी फायब्रोसिसची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. 

सध्या कोविडमधून बरे होणाऱ्या रुग्णांसाठी कोविड केंद्रात आणि रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ज्यात कोविडमधून बरे झालेले रुग्णांचा पाठपुरावा केला जातो. मात्र, त्यातही श्वसनाचा त्रास होऊन ऑक्सिजनची पातळी कमी होणारे आणि धाप लागणारे रुग्णांची संख्या अधिक आहे. शिवाय, कोविडमधून बरे होऊन ही एक एक महिना अशक्तपणा जाणवतो अशा तक्रारी हे बरे झालेले रुग्ण करत आहेत. त्यातील काही जणांना डायबिटीस आणि हायपरटेंशनच्या ही समस्या उद्बवल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. 

पालिकेच्या केईएम रुग्णालयात पहिल्यांदाच 22 पल्मनरी फायब्रोसिसचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर, ही संख्या वाढली असून आता एकूण 30 रुग्ण पल्मनरी फायब्रोसिसवर उपचार घेत आहेत. त्यापैकी 10 सध्या रुग्णालयात दाखल असून 20 जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यापैकी दोघांना ऑक्सिजनची सुविधा घरीच करुन देण्यात आलेली आहे. गेल्या पाच महिन्यात या सर्व रुग्णांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. तर, कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना पल्मनरी फायब्रोसिस होण्याचे प्रमाण 0.03 ते 0.5 एवढे आहे. केईएममध्ये दाखल झालेल्या पल्मनरी फायब्रोसिसच्या रुग्णांना 4 ते 6 लिटरपर्यंत ऑक्सिजनची गरज आहे.

नायरच्या सप्टेंबर महिन्याच्या ओपीडी मध्ये जवळपास 100 जणांना फॉलो अप ओपीडीत तपासले गेले. 100 पैकी 30 ते 40 जणांच्या एक्स-रे, सीटीस्कॅन आणि एमआरआयमध्ये काही बदल फुप्फुसरोगतज्ज्ञांना जाणवले आहेत. 40 जणांमधील 20 ते 30 टक्के म्हणजेच 8 ते 10 स्टिरॉईड उपचार दिले आहेत. यात पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि पालिका रुग्णालय प्रमुख डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे. दरम्यान, सायनमध्ये आतापर्यंत 100 पैकी 5 जणांना पल्मनरी फायब्रोसिस असल्याचं आढळलं आहे. तर, त्यापैकी काही जणांचे ऑक्सिजन कमी होऊन धाप लागते,  अशा रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवले जात असल्याचं सायन रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. निळकंठ आव्हाड यांनी सांगितले आहे. 

ज्या रुग्णांना खूप जास्त काळ उपचारादरम्यान व्हेटिलेटरवर ठेवले गेले आहे. शिवाय, जास्त काळ ऑक्सिजन दिले गेले. अशा रुग्णांना पल्मनरी फायब्रोसिस होण्याची शक्यता असते. शिवाय, ज्यांच्या फुप्फुसात गंभीर न्यूमोनिया होतो त्यांनाही फायब्रोसिस होतो. हे प्रमाण सध्या कमी आहे.  सिटीस्कॅन आणि एक्स-रे करुनच पल्मनरी फायब्रोसिस निश्चित केला जातो. 
डॉ. निळकंठ आव्हाड, पल्मोनोलॉजिस्ट, सायन रुग्णालय

काय आहे पल्मनरी फायब्रोसिस?

पल्मनरी फायब्रोसिस हा एक फुप्फुसाचा आजार आहे ज्यात तंतूमय फुप्फुसाना जखमा होऊन ते टणक होते आणि त्याच्यावर व्रण उमटतात. व्रण उमटल्याकारणाने त्यांची श्वासातील प्राणवायू आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची क्षमता कमी होते. परिणामी, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन रुग्णाला पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतो. 
 
पल्मनरी फायब्रोसिसच्या रुग्णांचा रिक्वहरी रेट पाच महिन्यांवर जातो. काही लोक त्यातून बरे ही होतात. पण, यावर सतत उपचार आणि योग्य निदान झालं तरच रुग्ण बरे होतील का नाही हे कळेल. 
डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय 
 

सेव्हन हिल्समध्ये 1 पल्मनरी फायब्रोसिसचा रुग्ण

सेव्हन हिल्समध्ये 1 सप्टेंबरपासून पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ज्यात आतापर्यंत एकूण 96 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे 20 रुग्ण आढळले आहेत. तर, एकाला फायब्रोसिसमध्ये होणारी फुफ्फुसाची गुंतागुंत आढळली असल्याचे सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले आहे.

एनएससीआय डोमच्या पोस्ट कोविड ओपीडीला वाढता प्रतिसाद

5 सप्टेंबरपासून आतापर्यंत जवळपास 250 रुग्णांना वरळीच्या एनएनसीआय डोममध्ये सुरू केलेल्या पोस्ट कोविड ओपीड उपचार देण्यात आले आहे. त्यापैकी वैद्यानिक निष्कर्षांनुसार, सुमारे 190 रुग्णांमध्ये फायब्रोसिस असू शकतो. मात्र, या सर्व रुग्णांचे एक्स-रे आणि सीटीस्कॅन झालेले नाही. ही आकडेवारी क्लिनिकल शोध आणि रुग्णांना उपचार म्हणून 6 मिनिटं चालण्याच्या टास्कच्या आधारे असून आधी केलेल्या एक्स-रे च्या रिपोर्टमध्ये काही बदल जाणवले असल्याचे एनएससीआय डोम जंम्बो कोविड सुविधेच्या व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. सायली कळझुणकर यांनी सांगितले आहे.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Increased patients pulmonary fibrosis in post covid OPD anemia even after treatment

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com