राज्यात यंदा विक्रमी ऊस गाळप होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugarcane

राज्यात यंदा विक्रमी ऊस गाळप होणार

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यात यंदा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन झाले असून, एक हजार ९६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. त्या दृष्टीने साखर कारखाने आणि आयुक्तालयाकडून ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा: भाजप नगरसवेक धीरज घाटेंच्या हत्येचा कट; पाहा व्हिडिओ

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक १२.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. गुळ आणि बेण्यांसाठी वापरण्यात येणारा दहा टक्के ऊस वगळता एक हजार ९६ लाख मेट्रिक टन ऊस साखर कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. सरासरी साखर उतारा ११.३० टक्के ग्राह्य धरल्यास राज्यात येत्या गाळप हंगामात १२२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. परंतु इथेनॉल निर्मितीमुळे एकूण उत्पादनाच्या तुलनेत सुमारे दहा लाख टन साखरेचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात ११२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.

हेही वाचा: पुणे : गणेश मंडळांच्या माध्यमातून मतदार जागृती होणार

राज्यात मागील हंगामात 190 साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले होते. त्यामध्ये 95 खासगी आणि 95 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. यावर्षी सुमारे 195 साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप करण्यात येणार आहे. त्यामध्ये खासगी साखर कारखान्याची संख्या शंभराच्या जवळपास असेल.

मंत्री समितीची बैठक पुढील आठवड्यात :

राज्यातील गाळप हंगाम हंगामाचे नियोजन करण्यासाठी मंत्री समितीची बैठक येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत या वर्षी होणाऱ्या विक्रमी ऊस उत्पादन पाहता हंगाम वेळेत पूर्ण कसा करता येईल, याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील. गाळप हंगाम सुरू करण्यासाठी 15 ऑक्टोबर की एक नोव्हेंबर ही तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी उसाचे उत्पादन पाहता 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे.

  • राज्यातील गाळप हंगाम (वर्ष २०२०)

  • उसाची लागवड : ११.४२ लाख हेक्टर

  • उसाचे गाळप : १०१४ लाख मेट्रिक टन

  • साखर उत्पादन : १०६ लाख मेट्रिक टन

हेही वाचा: शिक्षकांनी कायम विद्यार्थी राहून , नवीन कौशल्ये आत्मसात करावी; पाहा व्हिडिओ

  • गाळप हंगाम अंदाज (वर्ष २०२१)

  • उसाची लागवड : १२.३४ लाख हेक्टर

  • उसाचे गाळप : १०९६ लाख मेट्रिक टन

  • साखर उत्पादन : ११२ लाख मेट्रिक टन

"राज्यात यंदा विक्रमी उसाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यावर्षी इथेनॉल वगळता ११२ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. ऊस गाळपाच्या नियोजनासाठी मंत्री समितीची बैठक घेण्याबाबत गुरुवारी निर्णय होईल."

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त.