महेश मांजरेकरांना राज्य महिला आयोगाची नोटीस; तात्काळ बाजू मांडण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh manjarekar
महेश मांजरेकरांना राज्य महिला आयोगाची नोटीस; तात्काळ बाजू मांडण्याचे आदेश

तात्काळ बाजू मांडा; महेश मांजरेकरांना राज्य महिला आयोगाची नोटीस

मुंबई : दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाच्या ट्रेलबाबत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याची दखल राज्य महिला आयोगानं घेतली असून महेश मांजरेकर यांना नोटीस पाठवली आहे. तसेच या विषयी त्यांना तात्काळ आपली बाजू मांडावी, असे आदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. (State Women Commission notice to Mahesh Manjrekar)

चाकणकर यांनी म्हटलं की, "महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाच्या प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरबाबत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना, कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले आहे"

राज्य महिला आयोगानं नोटीसीत काय म्हटलंय?

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(१) (फ) (एक) व (दोन) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्त्रियांसंबंधीच्या तक्रारी स्विकारुन त्यावर विचारविनियम करुन त्याची दखल घेण्याची जबाबदारी आहे.

आपल्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारे तक्रारपत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झालं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जळजळीत सत्य दाखवण्याच्या नावाखाली स्त्रियांची अवहेलना केल्याचे चित्रपटाच्या ट्रेलर वरून दिसत आहे. त्यासोबतच लहान मुलांच्या बाबतही चुकीची दृश्य दाखविण्यात आली आहेत, त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी आक्षेप नोंदविला आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक म्हणून या निर्मिती मागची संकल्पना, कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेणे उचित वाटते. तरी उपरोक्त प्रकरणी आपण आपला खुलासा लेखी स्वरूपात महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आयोगास तात्काळ पाठविण्यात यावा.

चित्रपटाचा ट्रेलर हटवला

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट बोल्ड क्राईम ड्रामा स्वरुपातील हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारी २०२२ रोजी युट्यूबर प्रदर्शित करण्यात आला. परंतू जसा हा ट्रेलर प्रसिद्ध झाला लगेचच त्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. या ट्रेलरमध्ये महिलांबाबत आणि लहान मुलांबाबत आक्षेपार्ह चित्रण करण्यात आल्याचं सांगत त्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युट्यूबरुन हा ट्रेलर हटवण्यात आल्याचं चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: State Women Commission Notice To Mahesh Manjrekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top