solapur
M. raj kumaresakal

स्मार्ट सिटी सोलापूरची स्थिती! घरात लाखांचा ऐवज, पण घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत; पोलिस आयुक्त एम. राज कुमार म्हणाले...

घरी चोरी किंवा घरफोडी झाल्यावर पोलिस हमखास त्या चोरट्याला पकडतात, पण जलद तपासासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत होते. मात्र, घरात लाखांचा ऐवज, पण घरासमोर सहा- सात हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा नाही, अशी स्थिती सोलापूर स्मार्ट सिटीत पाहायला मिळते.

सोलापूर : घरी चोरी किंवा घरफोडी झाल्यावर पोलिस हमखास त्या चोरट्याला पकडतात, पण जलद तपासासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत होते. मात्र, घरात लाखांचा ऐवज, पण घरासमोर सहा- सात हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा नाही, अशी स्थिती सोलापूर स्मार्ट सिटीत पाहायला मिळते. पोलिसांची रात्रगस्त सुरू आहे, पण गल्लीबोळ अरुंद असल्याने त्याठिकाणी जाता येत नाही. अशावेळी नागरिकांनी कॅमेरे बसविणे व संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे जरुरी आहे.

मागील पाच महिन्यांत सोलापूर शहरात ६२ घरफोड्या, ११ जबरी चोऱ्या, जवळपास १७० वाहनांची चोरी व ९० इतर चोरीचे गुन्हे घडले आहेत. पोलिसांनी त्यातील काही चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले, मात्र अनेक गुन्ह्यांचा तपास सुरूच आहे. ज्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तेथील गुन्ह्यांचे तपास पोलिसांना सहजपणे शक्य होतात.

आपल्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकांनी सीसीटीव्ही बसवणे जरुरी आहे. मात्र, सोलापूर शहराची लोकसंख्या ११ लाखांपर्यंत असून शहरातील व्यावसायिक दुकानांसह घरांची संख्या अंदाजे अडीच लाखांपर्यंत आहे. दुसरीकडे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या मात्र पाच ते सात हजारांपर्यंतच असल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर एकतर घरात महागड्या मौल्यवान वस्तू, मोठी रोकड ठेवू नका, नाहीतर प्रत्येकांनी घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असा सूर निघत आहे.

गल्लीत कुत्री भुंकत असतानाही शेजारचे निवांत

फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील गायत्री नगर भाग- दोन परिसरात नुकतेच भाड्याने राहायला आलेल्या सतीश दिगंबर गव्हाणे यांच्या बंद घरातून चोरट्याने २९ मेच्या मध्यरात्री दोन लाखांचे दागिने व रोकड चोरून नेली. त्या दिवशी गल्लीतील कुत्री जोरजोरात भुंकत असतानाही शेजारच्यांनी त्याची चौकशी केली नाही. विशेष म्हणजे या परिसरातील बहुतेक घरांबाहेर सीसीटीव्ही नसल्याचेही फौजदार चावडी पोलिसांच्या निदर्शनास आले.

सुरक्षिततेसाठी प्रत्येकांनी लावावा सीसीटीव्ही कॅमेरा

घरफोडी किंवा चोरी झाल्यानंतर एका घरातून सरासरी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला जातोय. पोलिसांकडून क्युआर कोड पेट्रोलिंग, रात्रगस्त अशा उपाययोजना सुरूच आहेत. पण, नागरिकांनी घराबाहेर सहा- सात हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास चोरी, घरफोडीचे प्रकार थांबतील आणि पोलिसांनाही तपासात त्याची मदत होईल.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

क्युआर कोड रस्त्यावर, चोरी गल्लीत

पोलिसांनी सोलापूर शहरातील जवळपास ३०० हून अधिक ठिकाणी ‘क्युआर कोड’ लावले असून त्याठिकाणी दररोज पोलिस अंमलदारांना जाऊन तो क्युआर कोड स्कॅन करावा लागतो. चोरी, घरफोडीसह अन्य प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी अशी गस्त घातली जात आहे. मात्र, बहुतेक क्युआर कोड मुख्य रस्त्यांवर आहेत. चोरटे मात्र बंद घरे शोधून अरुंद रस्ते- गल्लीबोळात डाव साधत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com