
Kolhapur Violence : कोल्हापूर दंगलीमागे राजकीय पक्ष आहे का? अनिल परब
मुंबई : कोल्हापूरमधील दगडफेकीमागील घटनेला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का याचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याची आरोप करत यामागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली आहे.
कोल्हापूरमधील दंगलीसंदर्भात पत्रकार परिषद घेत अनिल परब म्हणाले, कुणीतरी जाणीवपूर्वक अशाप्रकारच्या घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहे. हा तणाव जाणूनबुजून निर्माण केला जातोय का ते शोधले पाहिजे. हे घडवून आणले जात असेल तर त्याची कारणे पण शोधण्याची गरज असून यामागे कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का हे शोधले पाहिजे. पोलिसांनी आपले काम चोख केलं पाहिजे. कोणत्याही दबावाखाली याची चौकशी होता कामा नये, अशी मागणी परब यांनी केली.
ते पुढे म्हणाले, की एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी घडली असेल, तर परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी ती गोष्ट घडवून आणायची आणि त्यावरून जातीय-धार्मिक सलोखा खराब करायचा, हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. जर महाराष्ट्रात अशांतता असेल तर कुठला गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार होईल.
आमच्याकडे पोलिसांकडून अपेक्षा करणे हाच एक मार्ग आहे. कारण योग्यप्रकारे तपास करणं ही पोलिसांचीच जबाबदारी आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.