esakal | सत्तेचा पोरखेळ चाललायं; आम्ही विरोधात राहू! शरद पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

Stop The Lay Of Government Formation In State Criticizes Sharad Pawar On Bjp And Shiv Sena

- शेतकऱ्यांनी मैदान सोडू नये
- नुकसानग्रस्त पिकांची सरसकट करावी कर्जमाफी

सत्तेचा पोरखेळ चाललायं; आम्ही विरोधात राहू! शरद पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शेतीचे धोरण असो, की अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देणे असो. प्रत्येकवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेत. अवकाळी पावसाच्या दणक्‍यानंतर शेतीची झालेली वाताहत पाहत आज पवार यांनी शेतकऱ्यांना मैदान सोडू नका, अशा शब्दांमध्ये धीर दिला. तसेच सध्यस्थितीत राज्यात सत्तेचा पोरखेळ चाललाय असे टीकास्त्र सोडत त्यांनी जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय दिला असल्याचे सांगत ही भूमिका पार पाडू असे स्पष्ट केले.

टाकेघोटी (ता. इगतपुरी) इथून पवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत त्यांची गाऱ्हाणी ऐकण्यास सुरवात केली. पुढे कळवण, बागलाणमधील नुकसानीची पाहणी करत पिंगळवाडे (ता. बागलाण) येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील पंचनाम्यांची माहिती देण्याची विनंती केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने सर्व पिकांच्या झालेल्या नुकसानीची सरसकट कर्जमाफी करावी. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीत कर्जपुरवठा करावा. त्या कर्जावर व्याज घेऊ नये.

शेतकऱ्यांकडील सर्व प्रकारची वसुली बंद करावी. याशिवाय सरकार अथवा राज्यपालांशी बोलून कोणत्याही अटी-शर्थीविना शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली जाईल. मुळातच, पीकविमा कंपन्यांचे काम चिंताजनक आहे. शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार नाही, यासाठी पीकविमा कंपन्या जाचक अटी शर्थी लावताहेत. याबाबत दिल्लीत अर्थ विभागाशी 3 अथवा 4 नोव्हेंबरला चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेला आधार देण्याचे काम सरकारचे असल्याने वरिष्ठ अधिकारी, सचिवांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठवायला हवे.

राष्ट्रपतींचे अधिकार दिल्याची माहिती नाही
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माझी भेट घेतली हे खरे आहे. पण राजकारणाबाबत चर्चा झाली नाही, असे सांगून कॉंग्रेसचे नेते दिल्लीला जाऊन त्यांच्या नेत्यांना भेटले याबाबत आपणाला माहिती नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांबाबत कल्पना नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याबद्दल वर्तवलेल्या शक्‍यतेबाबत बोलताना त्यांनी मुनगंटीवार यांना राष्ट्रपतींचे अधिकार दिले आहेत काय? याची माहिती नसल्याचे सांगितले आणि राज्यपाल बहुमत सिद्ध करा एवढे सांगू शकतात अशीही माहिती दिली.

शरद पवारांची शेतकऱ्यांना भावनिक साद; मी आलोय, काळजी करु नका

- मुलाबाळांची काळजी घ्या
- नुकसान आवाक्‍याच्याबाहेर असले, तरीही या संकटातून बाहेर पडू
- केंद्रीय नुकसान पाहणी समितीशी आम्ही संपर्क करू
- राज्य आणि केंद्र सरकारला जाऊन आम्ही इथली परिस्थिती सांगणार आहोत

शरद पवार म्हणाले,
- सत्तेच्या उन्मदाचे स्वागत राज्यात होत नाही, हे निवडणुकात दिसले. निवडणुकीत भाजपचे संख्याबळ कमी झालंय
- भाजप-शिवसेनेने लवकर सत्ता स्थापन करावी, अजूनही त्यांच्यात कुरबुरी सुरू आहेत हे योग्य नाही.
- 9 नोव्हेंबरला राम मंदिराबाबत होणारा निर्णय सर्वांना रुचेल असे नाही. त्यामुळे कायदा-आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही यासाठी सरकारी यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज
- सरकार अस्तित्वात नसल्याने जनतेचे मोठे नुकसान होत आहे. 1992 मध्ये झालेली अवस्था सावरायला खूप वेळ लागला. तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये.
- नवीन मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत आताच्या मुख्यमंत्र्यांनी असलेल्या अधिकाराचा वापर करत जनतेला मदत करावी.
- राज्य अडचणीत असताना आताच्या सरकारला जबाबदारी पार पाडता येत नाही ही खेदाची बाब
- द्राक्ष बागांमध्ये माल कुजला. कांदा सडला. अर्ली द्राक्षांचे नुकसान अधिक. डाळिंब, भात, बाजरी, मका, भाजीपाला, सोयाबीनचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक उध्वस्थ
- नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅंकेने दार बंद केले. जिल्हा बॅंक कर्जबाजारी आहे. बॅंकेच्या माध्यमातून मदत होण्याची शक्‍यता नसल्याने खासगी सावकारांकडून कर्ज घेतले जाते
- राज्यात यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी दोन दिवसात आत्महत्या केल्या.

loading image