काय म्हणाव या सरकारला; काही समजे ना... पोलिस विचारताहेत प्रश्‍न, वाचा व्यथा...

अनिल कांबळे
Thursday, 16 July 2020

कोरोना महामारीमुळे संगणक प्रशिक्षण केंद्र बंद असल्याचा फटका आता पोलिस कर्मचाऱ्यांना बसत आहे. कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या पोलिसांची पगारवाढ थांबविण्याचा शासनाचा निर्णय असल्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. 

नागपूर : महाराष्ट्र राज्य पोलिस दलाला डिजिटल बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला संगणकाचे किमान ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचाच परिपाक म्हणून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना "एमएससीआयटी' कोर्स उत्तीर्ण करण्याची अट ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न करणाऱ्या पोलिसांची वेतनवृद्धी थांबविण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासन वित्त विभागाने 30 जानेवारी 2020 ला परिपत्रक काढून सातव्या वेतनआयोगानुसार वेतनवाढ देण्याचे मंजूर केले होते. त्यासाठी प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एमएससीआयटी ही संगणक परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट ठेवण्यात आली होती. जो पोलिस कर्मचारी ही परीक्षा उत्तीर्ण करणार नाही, त्यांची वेतनवृद्धी रोखण्याचे आदेश होते.

जाणून घ्या - (Video) अरे व्वा... धानाच्या बांध्यात मत्स्यपालनाचा प्रयोग, शेतकऱ्याची आयडियाची कल्पना

मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी होती. त्यामुळे चार महिन्यात कोणत्याही परीक्षा झाल्या नाहीत. पोलिस कर्मचारी परीक्षा देण्यास तयार होते, मात्र कोवीड-19 मुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. परिणामतः ते पोलिस कर्मचारी वेतनवृद्धीसाठी पात्र होते. कोरोना महामारीमुळे संगणक प्रशिक्षण केंद्र बंद असल्याचा फटका आता पोलिस कर्मचाऱ्यांना बसत आहे. कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या पोलिसांची पगारवाढ थांबविण्याचा शासनाचा निर्णय असल्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामुळे काय म्हणाव या सरकारला असा प्रश्‍न पोलिस कर्मचारी एकमेकांना विचारत आहे. 

यांना मिळाली सूट

संगणक परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या अटीमधून काही पोलिसांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये 1993 वर्षांनंतर पोलिस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. तसेच ज्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वय 50 पेक्षा जास्त आहे, त्यांनाही ना एमएससीआयटी उत्तीर्ण करण्याची अट शिथिल केली आहे.

हेही वाचा - मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...

थॅंक यू पुणे सीपी

पुणे पोलिस आयुक्‍तालयाने पोलिस कर्मचाऱ्यांची वेतनवृद्धी न थांबवता काही महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसाच निर्णय नागपूर पोलिस आयुक्‍तालयाने घेतल्यास अनेकांना फायदा मिळू शकतो. तसेच संगणकाची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी वेळही मिळू शकतो. त्यामुळे पुणे आयुक्‍तालयाप्रमाणे नागपूर शहरातही संगणक प्रमाणपत्रांबाबत विचार व्हावा, अशी मागणी पोलिस वर्तुळातून व्यक्‍त होत आहे. 

सोशल मीडियावर खदखद

कोरोना महामारीमुळे चार महिन्यांपासून लॉकडाउन आहे. त्यामुळे एमएससीआयटी परीक्षाच घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुणे आयुक्‍तालयाप्रमाणेही नागपूर आयुक्‍तांनी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेक पोलिस कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. मुदतवाढ मिळाल्यास पोलिस कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणीही दूर होतील. 

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stopped pay hike for police who did not have MSCIT