(Video) अरे व्वा... धानाच्या बांध्यात मत्स्यपालनाचा प्रयोग, शेतकऱ्याची आयडियाची कल्पना 

श्रीकांत पेशट्टीवार 
Thursday, 16 July 2020

पश्‍चिम बंगालमध्ये प्रामुख्याने धानाच्या बांध्यात मत्स्यपालन केले जाते. लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली बांधव आपल्या शेतात मत्स्यपालन करतात. मात्र, नंदगुर येथील भाविक किन्नाके यांच्या शेतातील धानाच्या बांध्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

चंद्रपूर : धानाच्या बांध्यात मत्स्यपालन असे कुणी सांगितले तर त्यावर कुणाला विश्‍वास बसणार नाही. पण हे खरे आहे. चंद्रपूर तालुक्‍यातील नंदगुर या गावातील एका शेतकऱ्याने चक्क धानाच्या बांध्यात मत्स्यपालनाचा नवा प्रयोग केला. यात तो यशस्वी झाला आहे. मत्स्य पालनातून त्याला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. भाजीपाला, धान शेतीला जोडधंदा म्हणून त्याने लावलेली आयडिया त्याच्या आर्थिक उत्पनात भर घालणारी ठरली आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये प्रामुख्याने धानाच्या बांध्यात मत्स्यपालन केले जाते. लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली बांधव आपल्या शेतात मत्स्यपालन करतात. मात्र, नंदगुर येथील भाविक किन्नाके यांच्या शेतातील धानाच्या बांध्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. चंद्रपूर तालुक्‍यातील नंदगुर गावाची लोकसंख्या जेमतेम तीनशे. आदिवासी बांधवांची वस्ती असलेल्या या गावात अद्यापही मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

क्लिक करा - अमरावती शहरात सर्वत्र शुकशुकाट...नागरिकांमध्ये दहशत... काय आहे कारण

या गावातील भाविक किन्नाके या शेतकऱ्याच्या या नव्या प्रयोगाने हे गाव चर्चेत आले आहे. भाविक किन्नाके सुरवातीला गवंडीचे काम करायचे. यातून होणाऱ्या मिळकतीतून किन्नाके यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. घरातील गरजा वाढल्या. त्यात उत्पन्न तुटपुंजे. कामातही वाईट अनुभव. उत्पन्न वाढीसाठी किन्नाके यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलोपार्जित तीन एकर जमीन आहे. प्रारंभी एका एकरात त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. वांगे, दोडके, कारले लावले. त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न हाती आले. पुढे किन्नाके कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनाने किन्नाके यांनी शेतात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. 

त्यांच्या शेतापासून दीड किमी अंतरावरून अंधारी नदी वाहते. याच नदीतून त्यांनी शेतापर्यंत भूमिगत पाइपलाइन टाकली. शेतात ठिबक सिंचन केले. नदीतील पाण्याने त्यांनी शेतात भाजीपाल्यासोबतच धानाचे पीक घेणे सुरू केले. त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न हाती येऊ लागले. यातच कृषी विभागाचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आले. यात मत्स्यपालनाचा समावेश होता. कृषी विभागाने किन्नाके यांना मत्स्यपालनाबाबत मार्गदर्शनासोबत अनुदानही दिले. गेल्या हंगामात त्यांनी एक एकरात धानाचे पीक घेतले होते. 

धान निघाल्यानंतर ती जागा खालीच होती. धान शेतीच्या सभोवताल त्यांनी तीन मीटर खोल, दोन मीटर अरुंद चर खोदकाम केले. याच चरात त्यांनी पाणी सोडले. गेल्या ऑगस्ट महिन्यात या चरात रहू, कथला यासह अन्य प्रजातीची मत्स्य बिजाई सोडली. वर्षभर त्यांना खाद्य पुरविले. आता या चरातील मासोळ्या जवळजवळ एक ते दीड किलोच्या झाल्या आहेत. मत्स्य पालनातून त्यांना दीड ते दोन लाखांचे उत्पन्न होईल, असा अंदाज किन्नाके यांना आहे. किन्नाके यांना सातत्याने जिल्हा अधीक्षक कृषी पाटील, तालुका कृषी अधिकारी वहाणे, मंडळ अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी सहायक श्रीमती करोने, आत्म्याचे कन्नाके यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

मत्स्यपालनाची इच्छा 
कृषी विभागाचा एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम आहे. यातून प्लस्टिक अस्तीकरणासह शेततळ्याची मागणी केली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन करण्याची आपली इच्छा आहे. 
भाविक किन्नाके, प्रगतिशील शेतकरी, नंदगूर 

 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's Fisheries Experiment in rice Farming