'सरळ सेवा भरती' अडकली निविदेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

‘सरळ सेवा भरतीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रिया सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत तब्बल सव्वीस वेळा निविदेला मुदतवाढ मिळाली. एवढा वेळ निविदेत जाणार असेल, तर आमची भरती कधी होणार? लाखो उमेदवार या प्रक्रियेकडे लक्ष देऊन आहेत. लवकर प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. आमचा वेळ आणि वय दोन्ही वाया जात आहे,’’...अतुल पाटील सांगत होता.

पुणे - ‘सरळ सेवा भरतीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रिया सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत तब्बल सव्वीस वेळा निविदेला मुदतवाढ मिळाली. एवढा वेळ निविदेत जाणार असेल, तर आमची भरती कधी होणार? लाखो उमेदवार या प्रक्रियेकडे लक्ष देऊन आहेत. लवकर प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. आमचा वेळ आणि वय दोन्ही वाया जात आहे,’’...अतुल पाटील सांगत होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतुलने जिल्हा परिषदेसाठी दीड वर्षापूर्वी अर्ज भरला आहे. त्याच्याप्रमाणेच राज्यातील तरुणांची अशीच स्थिती आहे. महायुती सरकारच्या काळात सरळ सेवेच्या भरतीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ‘महापरीक्षा पोर्टल’ बंद केले. त्याऐवजी ‘महाआयटी’तर्फे नवीन कंपनीला भरतीचे काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. खासगी कंपनीकडून भरती प्रक्रिया राबविण्याचा आदेश राज्य सरकारने नुकताच काढला. लॉकडाउनपूर्वी निविदा प्रक्रिया राबविताना तांत्रिक अडचणींमुळे निविदा पुढे ढकलली जात असल्याचे ‘महाआयटी’ने  स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर लॉकडाउन म्हणून मुदतवाढ दिली, असे कारण देण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत २६ वेळा निविदेला मुदतवाढ देण्यात आली. १० सप्टेंबर रोजी निविदेची अखेरची तारीख आहे, त्यात परत मुदतवाढ मिळणार, की निविदा अंतिम होणार याकडे लक्ष लागले आहे. याबाबत ‘महाआयटी’चे कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण झाला नाही. 

ही आहेत पदे
आरोग्यसेवक, कृषिसेवक, शिक्षण सेवक, पोलिस शिपाई, ग्रामसेवक, तलाठी, कनिष्ठ अभियंता, सेवक, लिपिक यांसह अनेक पदांची भरती केली जाते, ही पदे राज्य शासनाच्या विभागासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आहेत.

जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियंता पदासाठी मी दीड वर्षापूर्वी अर्ज भरला आहे; पण आमची सरळ सेवेची परीक्षा कधी होईल, याचा काहीच अंदाज येत नाही. उमेदवारांच्या मानसिकतेचा विचार करून भरतीप्रक्रिया सुरू करावी.
- प्रकाश पाटील, उमेदवार

‘महाआयटी’कडून कंपनीची नेमणूक करून सरळ सेवा भरती लवकर करावी, यासाठी कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्याशी वारंवार संपर्क करून विचारणा करीत आहोत. ते सकारात्मक असल्याचे सांगतात; पण प्रत्यक्ष कृती शून्य आहे.
- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Straight service recruitment stuck in the tender