आघाडीतील मंत्र्यांना तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी काय दिल्या कडक सूचना

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

मी पाठविलेल्याला सचिव करा..
भाजपच्या माजी मंत्र्यांकडील अधिकारी आस्थापनावर नियुक्‍त केल्यास मंत्र्यांनी घेतलेले निर्णय, प्रशासनातील प्रकरणे याबाबतची संवेदनशील माहिती बाहेर फुटू शकते, अशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना शंका आहे. तसेच काही भाजपचे माजी मंत्रीच त्यांच्याकडे काम केलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्‍त करण्याची विनंती महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना करत असल्याचे एका मंत्र्याने सांगितले. त्यामुळे आघाडीच्या तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते सावध झाले आहेत. सत्तेमधील एका पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्याने तर ‘मी पाठवलेला अधिकारीच खासगी सचिव म्हणून नियुक्‍त करा, तुमच्या कितीही ओळखीचा अधिकारी असला तरी त्याची नियुक्‍ती करू नका,’ अशी सूचना दिल्याचे त्या पक्षाच्या मंत्र्याने सांगितले.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील संवेदनशील माहिती बाहेर फुटू नये, यासाठी फडणवीस सरकारच्या काळातील भाजप मंत्र्यांच्या आस्थापनावरील खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करू नये, अशा कडक सूचना आघाडीतील मंत्र्यांना तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात महाविकास आघाडी सरकार २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्तेत आले. तेव्हापासूनच शेकडोंच्या संख्येने राज्याच्या प्रशासनातील अधिकारी आपल्या नियुक्‍तीसाठी नव्या मंत्र्यांच्या मागे फिरत आहेत. यामध्ये फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडे काम केलेल्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या रविवारी मंत्र्यांकडील खात्यांचे वाटप करण्यात  आले. सुरवातीला शपथ घेतलेले सहा मंत्री, त्यानंतर विस्तार झाल्यावर सर्व मंत्र्यांना हे अधिकारी नियुक्‍ती करण्याची विनंती करत आहेत.

मध्यमवर्गीयांचे बिघडणार बजेट; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

संबंधित नियुक्‍त्या करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी नव्याने सूचना केल्याने अनेक मंत्री खासगी सचिव आणि ओएसडींच्या नियुक्‍त्या करताना गंभीरपणे विचार करत आहेत. सध्या १०५ आमदार असल्याने भाजप प्रबळ विरोधी पक्ष आहे. महाविकास आघाडीला खाली खेचण्याची संधी विरोधक सोडणार नसल्याची बाब स्पष्ट आहे. त्यामुळे सरकार चालविताना महाविकास आघाडी सरकारला अनेक गोष्टींचा बारीकसारीक विचार करावा लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strong instructions from all three parties to the leading ministers