'सीईटी' परीक्षेचं काहीच ठरेना; विद्यार्थ्यांसोबत आता पालकांचही वाढलंय टेन्शन!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

परीक्षा घेण्यास विलंब होत असताना हीच संधी साधून काही संस्था 'सीईटी' रद्द करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घेणे अपेक्षीत आहे.

पुणे : इयत्ता १२वीचा निकाल लागून एक आठवडा उलटून गेला तरी राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी परीक्षांचे नवे वेळपत्रक किंवा त्या होणार की नाही? याबाबत काहीच ठरत नसल्याने विद्यार्थी, पालकांचा तणाव वाढत आहे. 

सर्वच बोर्डाच्या बारावीचा नुकताच जाहीर झाला. राज्य सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी 'एमएचटी-सीईटी' परीक्षा घेतली जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश निश्‍चित केले जातात. मात्र अद्यापपर्यंत सीईटीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. यापूर्वी ५ मे रोजी होणारी ही सीईटी करोनाच्या संकटामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. बारावी निकालानंतर सीईटी कधी होणार आहे, याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे थांबले 'देणाऱ्यांचे हजारो हात'; सामाजिक संस्थांची झाली 'दुबळी झोळी!'​

तर दुसरीकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जेईई मेन्सची  परीक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निश्चित केली आहे. तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबरला होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना राज्य शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे. परीक्षा घेण्यास विलंब होत असताना हीच संधी साधून काही संस्था 'सीईटी' रद्द करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घेणे अपेक्षीत आहे.

याबाबत सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम म्हणाले, "अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीच्या 'एमएचटी-सीईटी'चा अजून कोणताच निर्णय झालेला नाही. ही सीईटी कधी होणार आहे, याविषयी आताच सांगता येणार नाही.

विद्यार्थ्यांनो, 'डिस्टन्स लर्निंग'चे वर्गही होणार ऑनलाईन; अर्ज भरण्यास झाली सुरवात!

१३५ गणांचा निर्णय प्रलंबित

अभियांत्रिकीला प्रवेश वाढावेत यासाठी अभियांत्रिकी प्रवेश घेण्यासाठी 'फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ (पीसीएम) या तीन विषयात १२वीला किमान खुल्या गटात १५० गुणांची, तर आरक्षित गटासाठी १३५ गुणांऐवजी अनुक्रमे १३५ आणि १२० गुणांची मर्यादा केली जाऊ शकते. यासंदर्भात संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली तरीही तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतला नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students and parents are confused as to whether the CET exam will be held or not