
नवी दिल्ली - स्पर्धा परीक्षांसाठी दिल्लीमध्ये आलेल्या आणि लॉकडाउनमुळे येथेच अडकलेल्या महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना परत घेऊन जाण्याची संपूर्ण तयारी राज्य सरकारने दाखवली असूनही दिल्ली सरकारकडून वेळेत प्रतिसाद येत नसल्याचे चित्र आहे. फायली आणि कागदांच्या जंजाळातील सारी प्रक्रिया पूर्ण होऊन दिल्लीपासून भुसावळपर्यंत विशेष रेल्वे गाडीद्वारे किमान पुढील आठवडाभरात बाराशे विद्यार्थी परत येतील अशी आशा करण्यात येत आहे.
राज्य सरकारचा पत्रव्यवहार
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी दिल्लीत राहतात. एका आकडेवारीनुसार यांची संख्या ८ ते १० हजारांच्या आसपास आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि इतरांनी प्रयत्न सुरू केले. राज्य सरकार यासाठी दिल्ली सरकारकडे वेळोवेळी संपर्क करत आहे. दिल्लीतील राज्याचे निवासी आयुक्त समीर सहाय हे याबाबत सातत्याने दिल्ली सरकारशी संपर्क साधून आहेत. या विद्यार्थ्यांना राज्यात परत घेऊन जाण्याबाबत संबंधित यंत्रणा आणि दिल्ली सरकारबरोबर राज्य सरकारने ३, ४, ५, ७ आणि ८ मे या तारखांना सातत्याने पत्रव्यवहार केला आहे.
संकेतस्थळ बंदच
सुरुवातीला दिल्लीने एक हजार ४५६ मुलांची यादी एका संकेतस्थळावर नोंदवून देण्यास सांगितली. या प्रक्रियेत समन्वयक म्हणून काम करणारे राजेश बोनवटे यांनी ‘महाराष्ट्र स्टुडंट स्टक्ड इन दिल्ली’ या नावाने मराठी विद्यार्थ्यांचा गट बनवला होता. त्यावरील मुलांची पहिली यादी तयार होती. मात्र दिल्ली सरकारचे हे संकेतस्थळ जे बंद पडले ते सहा दिवस उलटले तरी आजतागायत सुरू झालेले नाही. अखेर काल सहाय यांनी या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी दिल्ली सरकारकडे पोचविली आहे.
रेल्वेच्या अटी
राज्य सरकारने रेल्वे बरोबरही संपर्क साधला आहे. रेल्वेचे संबंधित अधिकारी ए. सी जैन यांनी विशेष रेल्वेगाडी सोडण्यासाठी घातलेल्या सर्व अटींची पूर्तता करण्याची तयारी राज्य सरकारने केली तरी दोन्ही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी राज्य सरकारांची संमतीपत्रांशी घोडे अडले आहे. राज्याने असे पत्र याआधीच सादर केले असले तरी दिल्ली सरकारने ते अजूनही दिलेले नाही. दोन तीन दिवसांत दिल्लीचे मुख्य सचिव पी. के. गुप्ता किंवा संबंधित नोडल अधिकारी उदित प्रकाश यांच्याकडून राज्याला ते मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे या बाराशे विद्यार्थ्यांसाठी विशेष गाडी लवकरात लवकर सोडण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे सहाय
यांनी सांगितले.
अजून प्रतीक्षाच
1) विद्यार्थ्यांची यादी आधी दिल्ली सरकारकडून मंजूर करावी लागेल
2) मंजुरीनंतर नोंदणी प्रक्रिया होईल.
3) नोंदणी झाल्यावर आरोग्य चाचणीसाठी या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर निरोप जाईल.
4) संबंधित गाडी कधी सोडली जाईल हे रेल्वे मंत्रालय राज्य सरकारला कळवेल
5) या सोपस्कारांसाठी किमान आठवड्याचा कालावधी लागेल
6) यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना राज्यात पाठवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.