esakal | अकरा गर्भपातानंतर महिलेची यशस्वी प्रसूती
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पहिल्या यशस्वी प्रसूतीदरम्यान रक्तातील दोषामुळे एका महिलेला पुढील 11 वेळेस गर्भपाताला सामोरे जावे लागले.

अकरा गर्भपातानंतर महिलेची यशस्वी प्रसूती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पहिल्या यशस्वी प्रसूतीदरम्यान रक्तातील दोषामुळे एका महिलेला पुढील 11 वेळेस गर्भपाताला सामोरे जावे लागले. त्यानंतर अखेर बाराव्या वेळेस मात्र रक्तदोषाचे निदान झाल्याने महिलेची यशस्वी प्रसूती झाली असून तिला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रुपाली गुरव असे संबंधित महिलेचे नाव असून सांताक्रूझ येथील खासगी रुग्णालयात त्यांची तेरावी प्रसूती पार पडली. रूपाली गुरव (32) यांचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यावेळी पहिल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर रुपाली यांना दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. मात्र, गर्भातच बाळाचा मृत्यू झाला. असे करत एकापाठोपाठ एक 11 मुले गर्भातच दगावली. दरम्यान, डॉक्‍टरांकडून कोणतेच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सातत्याने मूल गमावलेल्या गुरव दाम्पत्यांनी तेराव्या प्रसूतीसाठी सांताक्रूझ येथील खासगी रुग्णालय गाठले. त्यावेळी रुपाली यांच्या तपासणीत त्यांचा रक्तगट आरएच निगेटीव्ह, तर पतीचा रक्तगट आरएच पॉझिटीव्ह दिसून आला. पालकांमध्ये आरएच निगेटीव्ह व पोझिटीव्ह असा भिन्न रक्तगट असल्यास गर्भाच्या रक्तात प्रतिद्रव्ये निर्माण होतात व गर्भारपणाच्या काळात अनेक समस्या उद्‌भवतात.

याआधीच्या सर्व प्रसूतीदरम्यान ही तपासणी दुर्लक्षित राहिल्याने रूपाली यांच्या गर्भांना अनॅमिया झाल्याने त्यांना गर्भपातांना सामोरे जावे लागले, अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. वंदना बन्सल यांनी दिली. तसेच इतक्‍या समस्यांनंतर तेरावी प्रसूती आमच्यासाठी आव्हानात्मक असल्याचेही डॉ. बन्सल यांनी सांगितले. दरम्यान, तेराव्या प्रसूतीच्या वेळेस अल्ट्रासाऊण्ड आणि विशेष उपकरणाच्या माध्यमातून गर्भाशयातील बाळाची रक्तवाहिनी शोधली गेली.

बाळाची रक्ततपासणी केली असता हिमोग्लोबीन केवळ चार ग्रॅमपर्यंत होते. गर्भात बाळाचे हिमोग्लोबीन 14 ते 15 ग्रॅमपर्यंत आवश्‍यक असल्याने या बाळाच्याही जीवाला धोका होता. त्यामुळे डॉक्‍टरांकडून हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवण्यासाठी बाळाला गर्भातच बेशुद्ध करून चार वेळा रक्त देण्यात आले. त्यानंतर सातव्या महिन्यात रूपाली यांची प्रसूती झाली व त्यांना दुसऱ्यांदा कन्यारत्न मिळाले. दरम्यान, मुलीचे वजन केवळ दीड किलो असल्याने तिला पुन्हा रक्त चढवावे लागले व तीन महिन्यांच्या उपचारानंतर आई आणि मुलीला डिस्चार्ज देण्यात आला.

loading image
go to top