शेतकऱ्यांच्या हाती साडेनऊ हजार कोटी ! एफआरपीच्या 82.03 टक्के रक्कम कारखान्यांकडून अदा

प्रदीप बोरावके 
Thursday, 4 February 2021

यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे जानेवारी अखेरपर्यंत जवळपास साडेनऊ हजार कोटी रुपये राज्यातील ऊस उत्पादकांच्या हातात मिळाले आहेत. साखर आयुक्तालयाकडून याबाबतची आकडेवारी बुधवारी (ता. 3) जाहीर करण्यात आली आहे. 

माळीनगर (सोलापूर) : यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे जानेवारी अखेरपर्यंत जवळपास साडेनऊ हजार कोटी रुपये राज्यातील ऊस उत्पादकांच्या हातात मिळाले आहेत. साखर आयुक्तालयाकडून याबाबतची आकडेवारी बुधवारी (ता. 3) जाहीर करण्यात आली आहे. 

यंदाच्या हंगामात उसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसांत उसाची एफआरपी मिळण्यासाठी शेतकरी संघटनांचा आग्रह होता. त्यासाठी राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी आंदोलने केली. कोल्हापूर, सांगली भागात एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी आक्रमक होते. या भागातील अनेक कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. अन्य भागात आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून कारखाने एफआरपीचे तुकडे करून ऊसबिले देत आहेत. 

राज्यात यंदा 183 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. त्यामध्ये 31 जानेवारीअखेर 529.43 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाची एकूण देय असलेली एफआरपीची रक्कम 11568.84 कोटी रुपये आहे. त्यापैकी 9490.45 कोटी रुपये एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामध्ये 8.76 कोटी रुपये एफआरपीची जादा रक्कम देण्यात आली आहे. एकूण एफआरपीच्या 82.03 टक्के रक्कम शेतकऱ्यांना कारखान्यांकडून अदा करण्यात आली आहे. चालू हंगामातील 2078.48 कोटी रुपये एफआरपीची थकबाकी आहे. 80 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली आहे. 103 कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी आहे. 30 कारखान्यांनी 100 टक्केपर्यंत, 22 कारखान्यांनी 80 टक्केपर्यंत तर 51 कारखान्यांनी 60 टक्केपर्यंत एफआरपी दिली आहे. 

साखर आयुक्तांनी गाळप झालेल्या उसाची अधिकाधिक एफआरपी वेळेत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी साखर कारखान्यांवर नियंत्रण ठेवले. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना चांगली रक्कम मिळाली आहे. दरम्यान, मागील सर्व हंगामातील मिळून 330.36 कोटी रुपये एफआरपीची थकबाकी अद्यापही कारखान्यांकडे आहे. आरआरसी अंतर्गत अद्यापपर्यंत कोणत्याही कारखान्यावर यंदा कारवाई झालेली नाही. 

चालू हंगामातील देशातील उच्चांकी 82 टक्के एफआरपी महाराष्ट्रातील कारखान्यांनी दिली आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडेनऊ हजार कोटी रुपये ऊसबिलाच्या स्वरूपात मिळाले आहेत. 
- शेखर गायकवाड, 
साखर आयुक्त 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar mills in the state have paid eighty percent FRP to farmers