उसाच्या मापात पाप करणाऱ्या साखर कारखान्यांना बसणार चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar-Gaikwad

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी वजन काट्यावर मोजून साखर कारखान्याला देण्यासाठी आणलेला ऊस स्वीकारणे साखर कारखान्यांवर बंधनकारक आहे.

उसाच्या मापात पाप करणाऱ्या साखर कारखान्यांना बसणार चाप

पुणे - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी वजन काट्यावर मोजून साखर कारखान्याला देण्यासाठी आणलेला ऊस स्वीकारणे साखर कारखान्यांवर बंधनकारक आहे. असा ऊस कोणताही कारखान्याला नाकारता येणार नाही, असे पत्र राज्याच्या वैध मापन विभागाने साखर आयुक्तालयाला पाठविले आहे. या पत्राच्या आधारे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे याबाबत सर्व साखर कारखान्यांना तसा आदेश देणार आहेत. यामुळे उसाच्या मापात पाप करणाऱ्या साखर कारखान्यांना यापुढे चाप बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

साखर आयुक्त गायकवाड यांनी याबाबात वैधमापन विभागाला प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाच्या आधारे वैधमापन विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी साखर आयुक्तालयाला पत्राद्वारे हा निर्वाळा दिला असल्याचे शेखर गायकवाड यांनी सोमवारी (ता.७) मोर्चेकरी शेतकऱ्यांना सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर आयुक्तालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उसाचे वजन मोजताना होणारी काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी गायकवाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ही माहिती दिली.

उसाच्या वजनामध्ये फसवणूक होऊ नये, या उद्देशाने ऊस उत्पादक शेतकरी हे त्यांच्या उसाच्या वजनाची पडताळणी करण्याच्या उद्देशाने ऊस कारखान्याला नेण्यापूर्वी अगोदर खासगी काट्यावर मोजून घेत असतात. परंतु असा आधीच मोजलेला ऊस स्वीकारण्यास साखर कारखाने नकार देत असल्याच्या तक्रारीसुद्धा शेतकऱ्यांकडून वैध मापन विभागाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचीही वैध मापन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. खासगी वजन काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखान्यांकडून नाकारणे ही अनुचित प्रथा ठरेल. कारण या विभागाच्यावतीने साखर कारखाने व खासगी वजन काट्यांची पडताळणी करून ते प्रमाणित केले जातात. यासाठी वैध मापन शास्त्र नियमानुसार एकसमान कार्यपद्धती अवलंबिण्यात येते,’ असेही या डॉ. रवींद्र सिंघल यांनी साखर आयुक्तालयाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

जिल्हानिहाय भरारी पथके

राज्यातील सहकारी व खासगी कारखान्यांचे वजन काटे तपासण्याची मोहीम साखर आयुक्तालयाच्यावतीने हाती घेतली जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथकाची नियुक्ती केली जाणार आहे. ही पथके अचानकपणे साखर कारखान्यांना भेटी देऊन त्यांच्या वजन काट्याची तपासणी करेल. यामुळे उसाच्या वजनात शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबणार असल्याचे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी सांगितले.