Mahatma Jyotiba Phule : विचारक्रांतीची प्रेरणा देणारा महात्मा

महात्मा फुले हे कर्ते सुधारक असल्याने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांच्या जीवन, कार्य आणि विचारांकडे आकर्षित झाले. ‘जोतिचरित्र’चे लेखन ही त्याचीच परिणती.
mahatma jyotirao phule
mahatma jyotirao phuleesakal

महात्मा फुले हे कर्ते सुधारक असल्याने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांच्या जीवन, कार्य आणि विचारांकडे आकर्षित झाले. ‘जोतिचरित्र’चे लेखन ही त्याचीच परिणती. महात्मा फुले यांची १९७वी जयंती आज (ता.११) साजरी करताना म. फुले यांच्या विचारांची, कार्याची उजळणी व्हावयास हवी.

महात्मा जोतिराव फुले यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हिंदुस्थानातील सामाजिक गुलामगिरीविरोधात बंड करणारा पहिला ‘पुरुष’ मानत. २७ नोव्हेंबर, १९३७ रोजी न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारवाड्यासमोर काँग्रेस पक्षातर्फे महात्मा फुले पुण्यतिथीचा कार्यक्रम योजण्यात आला होता. त्या सभेत सेनापती बापट, केशवराव जेधे, केशवराव बागडे आदींची भाषणे झाली.

या सभेत महात्मा फुले यांना अभिवादन करताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी म्हणाले होते, ‘‘गेल्या साडेतीन हजार वर्षांत जी गोष्ट घडून आली नाही आणि जी घडून येणे हिंदुस्थानच्या दृष्टीने इष्ट होती, ती क्रांतिकारी गोष्ट म्हणजे ब्राह्मणांविरुद्ध बंड करणे ही होय. ती जोतिराव फुले यांनी केली यात त्यांचे ‘महात्मा’ पद आहे.’

त्यानंतरच्या काळामध्ये १९४६च्या दरम्यान महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा रौप्यमहोत्सव ब्राह्म समाज, वाईतर्फे साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त तर्कतीर्थांची तीन व्याख्याने योजली होती. त्यांचे विषय होते- ‘सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले’ ‘सत्यशोधक समाज व ब्राह्मसमाज’, ‘शेतकरी व कामकरी जनतेचे स्वराज्य’. यापैकी दोनच भाषणे उपलब्ध असून प्रथम भाषण ‘ज्योति-निबंध’ नावाने प्रकाशित आहे.

त्याला सत्यशोधक कार्यकर्ते रा. ना. चव्हाण यांची मार्मिक प्रस्तावना आहे. भाषणात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘पाश्चात्य सत्तेने येथील सर्व प्रकारच्या सुधारणांचा पाया घातला. इथे ब्राह्म समाज, प्रार्थना समाज यांनी जे कार्य हाती घेतले होते, ते धर्मसुधारणेतून समाजसुधारणेचे होते. जडवादी विचार इथे रुजविण्याचे कार्य ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकरांनी केले. ब्राह्मणेतरांच्या चळवळीचा पाया महात्मा फुले यांनी घातला.

ब्राह्मणेतरांच्या सुधारकांचे प्रश्न मागासलेल्या बहुसंख्य जनतेच्या जीवनाशी निगडित होते. शेतकरी, स्रियांचे प्रश्न समाजाच्या ऐरणीवर आले, ते महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ‘इशारा’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’ सारख्या ग्रंथांमुळेच. इथे मिळणारे शिक्षण अंधश्रद्धा आणि भोळेपणा नष्ट करणारे असले पाहिजे म्हणून महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणप्रसाराचे काम हाती घेतले.

इतकेच नव्हे तर धर्म, रुढी, परंपरांचे प्राबल्य असलेल्या समाजात कुमारीमाता, परित्यक्ता आणि त्यांच्या अश्राप अपत्यांचे संरक्षण व पुनर्वसनार्थ ‘बालहत्त्या प्रतिबंधक गृह’ सुरू करून अनौरस समजल्या जाणाऱ्या अपत्यांना दत्तक घेण्याचे कार्य केले.’

ज्योति-निबंध, चरित्राची पायाभरणी

महात्मा फुले हे कर्ते सुधारक राहिल्याने तर्कतीर्थ त्यांच्या जीवन, कार्य, विचाराकडे आकर्षित झाले. ‘ज्योति-निबंध’ प्रकाशित झाल्यावर ‘दीनबंधू’कार मुकुंदराव पाटील यांनी त्याची प्रशंसा करत तर्कतीर्थांनी महात्मा फुले यांच्या चरित्रावर अधिक प्रकाश पाडावा, असे आवाहन आपल्या साप्ताहिकाच्या २८ नोव्हेंबर १९४७ रोजीच्या अंकात केले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांनी महात्मा फुले यांच्या साहित्यावर आधारीत अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे १९६९ मध्ये प्रथमतः ‘महात्मा फुले समग्र वाड्ःमय’ प्रकाशित केले. त्यांचे संपादन वेळोवेळी सर्वश्री धनंजय कीर, डॉ. स.गं. मालशे, डॉ. य. दि. फडके यांनी केले होते. त्याच्या प्रथम आवृत्तीस तर्कतीर्थांची दीर्घ प्रस्तावना आहे.

या प्रस्तावनेत महात्मा फुले यांचे द्रष्टेपण आणि उदारता अधोरेखित करताना म्हटले आहे, ‘आता स्वातंत्र्योतर काळात ब्राह्मणेतर वाद जीर्ण झाला असून त्यातील अभिनिवेश कायम राहिला तर तो अधोगतीचे लक्षण ठरेल, याची दखल आधुनिक लोकशाही शक्तींनी स्पष्टपणे घेतली पाहिजे. ज्या परंपरागत संस्कृतीवर जोतिरावांनी हल्ला केला. त्या संस्कृतीचेच एक प्रत्यंतर म्हणजे लोकशाही भारतातील ब्राह्मणेतरवाद आणि जातिवाद होय.

जोतीरावांनी ब्राह्मणांवर कडाडून हल्ला केला. मात्र ज्या ब्राह्मणांनी सत्यशोधक समाजास सहकार्य केले, त्याचा त्यांनी नेहमीच आदर केला. ‘महात्मा फुले समग्र वाड्ःमय’ संग्रहात त्याबाबत संदर्भ दिसून येतात. त्यांचा हल्ला विशिष्ट जातीतील माणसांवर नव्हता. हा विवेक त्यांच्या हृदयात सतत जागृत होता. हा विवेक त्यांच्या चाहत्यांमध्ये जर जागृत राहिला तर आगामी यादवी टाळण्याचे श्रेय पदरात पडू शकेल.’

सत्यशोधक चळवळीतील एक खंदे कार्यकर्ते रा. ना. चव्हाण यांनी महात्मा फुले यांच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ग्रंथाचे सार संपादित केले होते. त्यासही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांची साक्षेपी प्रस्तावना आहे. त्यात ते स्पष्ट करतात की, ‘सत्यशोधक चळवळ म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ असे संकुचित रुप गृहीत धरले तर यापुढे या चळवळीला यत्किंचितही भवितव्य नाही, हे निश्चित समजावे.

बहुजन समाज हा उच्चनीच जातिभेदाच्या अहंकाराने फुटीर, विस्कळीत व दुर्बल झाला आहे. अंधश्रद्धेच्या अंधारात चाचपडत आहे. त्यांच्यात विचारक्रांती झाल्याशिवाय नवजीवनाच्या प्रेरणा प्राप्त होणार नाहीत, त्यासाठी जोतिराव फुले यांची विचारसरणी आत्मसात करावयास पाहिजे.’

‘दीनबंधू’कार मुकुंदराव पाटील यांची अपेक्षा लक्षात ठेवून तर्कतीर्थांनी १९९० हे महात्मा फुले यांचे ‘स्मृती शताब्दी वर्ष’ आणि १९९१ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ असे औचित्य साधून भारतीय पुस्तक न्यासासाठी (नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया) १९९१ मध्ये ‘जोतिचरित्र’ लिहिले. ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत प्रकाशीत झाल्याने महात्मा फुले यांचे जीवन, कार्य, विचार राष्‍ट्रीय आणि जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत झाली.

मराठीत दलपतसिंह चव्हाण, डॉ. कृष्णमूर्ती पोटफोडे, यशवंतराव फुले, अनंत एकनाथ गवंडी, पंढरीनाथ सीताराम पाटील आदींनी महात्मा फुले चरित्र लिहून त्यांच्या जीवनातील अप्रकाशित घटनांवर प्रकाशझोत टाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर तर्कतीर्थांचे हे ‘जोतिचरित्र’ वस्तुनिष्ठ चरित्र लेखनाचा वस्तुपाठ म्हणून पाहता येते.

मथितार्थ लक्षात घ्यावा

महात्मा फुले यांची २०२७ मध्ये दोनशेवी जयंती साजरी होईल. त्यांची जयंती वा पुण्यतिथी कर्मकांड न होता समकालात आपल्या समाजापुढील जे प्रश्न आहेत, जी आव्हाने आहेत, त्यांचा मुकाबला करण्याचे बळ त्यांच्या जीवनचरित्रातून घ्यायला हवे. चरित्रे तेव्हाच प्रेरक ठरतात, जेव्हा आपण महापुरुषांच्या जीवनाकडे प्रश्न, समस्यांच्या सोडवणुकीचे साधन म्हणून पाहतो.

तेव्हा महात्मा फुले यांचे समग्र जीवन व साहित्य हे परंपरेस छेद देणारे, व्यर्थ ते सोडण्याची शिकवण देणारे आहे. त्याचा मथितार्थ लक्षात घ्यावा. महात्मा फुले यांनी शूद्र, शेतकरी, स्रिया यांच्या उत्थान आणि विकासाचे जे स्वप्न पाहिले होते ते प्रत्यक्षात उतरवणे हेच त्यांचे खरे स्मरण आणि अभिवादन होय!

(लेखक सामाजिक प्रश्‍नांचे अभ्यासक व साहित्यिक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com