
Supriya Sule : कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया!म्हणाल्या...
Supriya Sule : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पवारांनी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सुळे यांच्याकडे पक्षाने पंजाब आणि हरियाणाची जबाबदारीही दिली आहे. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांना मध्य प्रदेश आणि गुजरातसह 5 राज्यांचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे.
"पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आपला निर्णय जाहीर करताना शरद पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर आम्ही कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देत आहोत. यासोबतच त्यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेल पक्षाच्या राज्यसभेतील कामकाजही पाहतील. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर दुसरी जबाबदारी दिली जात असल्याचे पवार म्हणाले. त्यांना कार्याध्यक्ष बनवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. हरियाणा, पंजाब, यूपी आणि लोकसभेच्या समन्वयाचे काम त्यांच्याकडे असेल.