Maharashtra Politics :राज्यातील ईडीचे सरकार असंवेदनशील; सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे; महाराष्ट्रात दुर्दैवी राजकारण सुरू असल्याची टीका
Supriya Sule statement Government of ED insensitive maharashtra politics satara
Supriya Sule statement Government of ED insensitive maharashtra politics satarasakal

कऱ्हाड : राज्यात सत्तेवर असलेले ईडीचे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. सरकारबद्दल रोज जे ऐकायला मिळतेय ते चिंताजनक आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे राज्य आहे. आम्हाला सत्ता गेल्याचे दुःख नाही. मात्र, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे हे दुर्दैवी आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सरकार टिकेल का नाही माहीत नाही, मात्र सर्व आमदार तयारीला लागले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुळे आज येथे दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, सत्यजितसिंह पाटणकर, देवराज पाटील, शहाजी क्षीरसागर, प्रशांत यादव आदी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘विकासकामांपेक्षा त्यांच्या मेळाव्यांची चर्चा जास्त सुरू आहे.

सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले महाविकास आघाडीचे निर्णय स्थगित केले आणि नव्या सरकारकडून विकासकामेही केली जात नाहीत. कोविडचे पैसे आले नाहीत, पिकांची नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेले ईडीचे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. ९५ टक्के ईडीच्या केसेस विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केलेल्या आहेत. ५० खोके पण ग्रामीण भागात पोचले आहेत.’’

रक्ताची नाती संपत नसतात, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले. त्यावर सुळे म्हणाल्या, ‘‘सर्वच नाती रक्ताची नसतात, प्रेमाची, जिव्हाळ्याची नाती असतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या आल्या तर स्वागतच आहे.’’ आरएसएसवर बंदी घालण्यासंदर्भात त्या म्हणाल्या, ‘‘कोणावर बंदी घालताना संविधानच्या चौकटीत राहून निर्णय घेतला पाहिजेत. आपण संविधान विसरत चाललो आहोत. अनेक गोष्टी संविधानाच्या बाहेर चालल्या आहेत. संविधान हा आपला कणा आहे. तेच आता विसरत चालले आहेत.’’

बारामतीचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत का, या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘भाजपचे जे. पी. नड्डा म्हणताहेत एक देश एक पक्ष, मात्र आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर विश्वास असून, त्यांच्या मते एक देश अनेक पक्ष यावर आम्ही ठाम आहोत. सगळ्यात चांगली गोष्ट सर्वांना हवीहवीशी वाटते. तशीच अवस्था बारामतीची आहे. त्यामुळे जे-जे बारामती बघायला येत असतील, त्यांचे आम्ही स्वागत करू.’’

यशवंतरावांच्या पत्रांचे होणार पॉडकास्ट

यशवंतराव चव्हाण यांच्या पत्राचे पॉडकास्ट करणार आहे. पॉडकॉस्ट काही ऐकायची, काही व्हिडिओ स्वरूपात करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. ते जिल्हा परिषद शाळांत पोचवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘राज्यातून ८० मुलांना निवडून कृषीसाठी, ४० शिक्षक आणि २० साहित्यिकांसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू केली आहे. त्या- त्या फेलोशिपमधून समाजात बदल घडावा, यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमार्फत प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषा आणि साहित्य पुढे नेण्यासाठी सेंटरमार्फत आम्ही नवीन लेखकांसाठी मार्गदर्शनाचाही उपक्रम राबवत आहोत. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांची पुस्तके स्टोरी टेलिंगवर टाकली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com