
Sushant Singh Rajput Death : आत्महत्या नव्हे हत्याच; रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या जवळपास अडीच वर्षांनंतर आता पुन्हा त्याची चर्चा सुरू झाली आहे. यातच ही आत्महत्या नव्हे हत्याच आहे, असा खळबळजनक दावा रुग्णालयातल्या एका कर्मचाऱ्याने केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली होती, असा दावा कूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याने केला आहे. या रुग्णालयाच्या शवागृहात काम करणाऱ्या रुपकुमार शाह यांचा हा दावा आहे. सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या मृतदेहावर जखमा होत्या, शरीराला मुका मार लागला होता, असंही शाह यांनी सांगितलं आहे.
शाह पुढे म्हणाले, "मृतदेहावर शवविच्छेदन होत असताना मी पूर्ण वेळ तिथे होतो. मी डॉक्टरांना सांगितलं होतं की ही सुसाईड केस नसून मर्डर केस आहे. पण त्यावेळी कोणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही." नोकरीत आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण इतके दिवस याविषयी बोललो नसल्याचं शाह यांनी सांगितलं आहे.
रुपकुमार शाह हे कूपर रुग्णालयातल्या शवागृहातच काम करत होते. दीड महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी या विषयी खुलासा केला आहे.