
विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवण्यामागं षडयंत्र असल्याचा संशय - गृहमंत्री
मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षां ऑफलाईन घेण्याविरोधात राज्यातील विविध शहरांमध्ये अचानक मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. यामध्ये काही जणांनी हुल्लडबाजी करत स्कूल बसेसच्या काचा फोडल्याचा तसेच दगडफेक केल्याचा प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्तानी भाऊनं विद्यार्थ्यांना चिथवल्याचा आरोप होत आहे. याची राज्याच्या गृहविभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून यामागे षडयंत्र असल्याचा संशय गृहमंत्री दिलीप वळसे यांनी व्यक्त केला आहे. (Students Protest Maharashtra Suspicion of conspiracy to take students to streets HM Walase)
हेही वाचा: 'क्रिकेटमध्ये जसे दोन राखीव खेळाडू, तसेच भाजपकडे ईडी, सीबीआय'
वळसे म्हणाले, "विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणींबाबत काही भूमिका मांडायची असेल तर त्यांनी सरकारकडे मांडायला पाहिजे होती. पण मला असं वाटत नाही की विद्यार्थी अशा प्रकारे स्वतःहून रस्त्यावर आले असतील. यामागे कुठलीतरी शक्ती असली पाहिजे ज्यामुळं जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांकडून हे घडवून आणण्यात आलं आहे. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत"
प्राथमिकदृष्ट्या षडयंत्र असल्याचा संशय
गेल्या दोन दिवसांपासून व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चिथवण्यात आल्याचंही प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे. यामध्ये मुंबईत, पुण्यात, नागपूरला आंदोलन करायचं असं या मुलांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळं हे ठरवून कुठल्यातरी संघटनेनं केलेलं कृत्य आहे. शिक्षण विभागाला याबाबत विद्यार्थ्यांनी काही निवेदन दिलंय की नाही याची मला माहिती नाही. पण जे व्हिडिओ समोर आलेत त्यामध्ये आम्ही दोन तीन दिवसात आंदोलनाचा धमाका करणार आहोत. सगळ्यांनी रस्त्यावर उतरा, असं आवाहनही यातून करण्यात आलं आहे. त्यामुळं हे षडयंत्र आहे असं वाटतं, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही यावेळी वळसे यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांना केलं आवाहन
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या मुद्यामध्ये शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री लक्ष घालून यातून मार्ग काढतील. त्यामुळं माझं विद्यार्थ्यांना आवाहन आहे की, त्यांनी शांततेत अभ्यास करावा. आपल्या हिताची काळजी सरकारला आहे. सरकार नक्कीच आपल्याला याप्रकरणी मदत करण्याच्या भूमिकेत आहे, असं आवाहन यावेळी गृहमंत्री वळसे यांनी केलं आहे.
Web Title: Suspicion Of Conspiracy To Take Students To Streets Hm Walase
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..