esakal | पुन्हा एकत्र येण्यासाठी हात पुढे करणाऱ्या सदाभाऊंना राजु शेट्टींचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

sadabhau raju shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या आणि भाजपसोबत गेलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो असं म्हणत राजू शेट्टी यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचे संकेत दिले होते.

पुन्हा एकत्र येण्यासाठी हात पुढे करणाऱ्या सदाभाऊंना राजु शेट्टींचा टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या आणि भाजपसोबत गेलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो असं म्हणत राजू शेट्टी यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचे संकेत दिले होते. मात्र याला उत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

राजू शेट्टी यांनी म्हटलं की, ज्यांचे हात आणि चारित्र्य स्व्चछ आहे त्यांच्यासोबत मी काम करतो. त्यांच्याकडे या दोन्हीही गोष्टी नाहीत. संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा घेण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत सदाभाऊ खोत पुन्हा संघटनेत येणार का या शक्यतेला त्यांनी फेटाळून लावलं आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पुतना मावशीचं प्रेम अनेक जण दाखवत असतात. पण त्यात गांभीर्य किती आहे बघायला हवं. मगरीचं अश्रू ढाळणाऱ्या खोतांबद्दल आम्हाला काही वाटण्याचं कारण नाही. आम्ही आमच्या मार्गाने निघालो आहोत आणि पुढे जात राहू. त्यांना आता अस्तित्वाची भीती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आमच्यासाठी प्रेम व्यक्त होतंय. पण त्यांच्या या बोलण्यात फसणार नाही.

हे वाचा - महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे: नितेश राणे

सदाभाऊ खोत यांना हाकलण्याचं मूळ कारण हेच होतं की ते स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य या आमच्या निकषांमध्ये बसत नव्हते. मला स्वच्छ हाताच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या माणसासोबत काम करायची सवय आहे. ज्यांना समिती नेमून संघटनेतून हाकललं आहे त्यांना पक्षात परत घेण्याचा प्रश्नच येत नाही असंही राजू शेट्टी म्हणाले.

सदाभाऊंवर टीका करताना राजू शेट्टी यांनी असंही म्हटलं की, खोत यांना खरंच पश्चाताप होत असेल तर आधी त्यांनी गोरगरिब शेतकऱ्यांचे कडकनाथ घोटाळ्यात बुडालेले पैसे मिळवून द्यावेत. आज ते शेतकरी तडफडत आहेत आणि त्यांची दिवाळी वाईट झालीय. त्यांचे पैसे परत केलेत तरच सदाभाऊंच्या मागणीचा विचार करता येईल.