
‘छत्तीसगडमधील कोळशाची खाण घेणार’
पुणे : ‘‘राज्यातील वीज भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राष्ट्रीय पातळीवर कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. राज्य सरकारने परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कोळशाची टंचाई दूर करण्यासाठी छत्तीसगड राज्यातील कोळशाची एक खाणच ऊर्जा विभागासाठी घेण्यात येत आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) बालगंधर्व येथे आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट आहे. देशात कोळशाची टंचाई आहे, ही वस्तुस्थिती आहे. छत्तीसगडचे सरकार हे काँग्रेसच्या विचाराचे सरकार आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी छत्तीसगड सरकारला महाराष्ट्रासाठी कोळसा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे प्रयत्न करीत आहेत.’’
राज्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना १२ तासांतच स्थगिती देण्याचा निर्णय गृह विभागाकडून घेण्यात आला. यासंदर्भात पवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी कमिटीच्या शिफारशींनुसार निर्णय घेतला. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती का दिली, याबाबत त्यांच्याकडून माहिती घेत नाही, तोपर्यंत मला काही सांगता येणार नाही.’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथील कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्यामुळे एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यावरून पवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांचे कान टोचले. ‘‘कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एखाद्या समाजाचा आणि घटकांबद्दल अपमान होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. राजकीय नेत्यांनी तारतम्य ठेवूनच वक्तव्ये करावीत,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले. देशातील नागरी सहकारी बॅंकांचा २२१ कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आणला गेला. परंतु, राष्ट्रीयकृत बॅंकांकडून ६७ हजार कोटींचा गैरव्यवहार समोर आला. त्या तुलनेत नागरी बॅंकांचा गैरव्यवहार हा पाव टक्का आहे. मात्र, आपण गैरव्यवहाराचे समर्थन करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पीएमपी कर्मचाऱ्यांना पैसे मिळणार
पीएमपी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांसोबत माझी चर्चा झाली आहे. कर्मचाऱ्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल, असे दोन्ही महापालिका आयुक्तांनी मला सांगितले आहे, असे पवार यांनी नमूद केले.
...अशा प्रश्नांवर पवार नाराज
अमोल मिटकरी यांनी सांगलीतील सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने कोठे काही वक्तव्य केले की तुम्ही लगेच मला प्रतिक्रिया विचारता, तुमचे मत काय? नेहमी असलेच प्रश्न विचारता. तुम्ही त्यांनाच विचारा. कोरोना कालावधीत काही मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तुम्ही हा प्रश्न संबंधित मंत्र्यांनाच विचारा. मला कशाला विचारता? असे म्हणत पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यातील वीज टंचाईला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. राज्यामध्ये अघोषित भारनियमन सुरू असून वीज बिल वसुलीसाठी सक्ती सुरू आहे. याविरोधात भाजप महावितरणच्या सर्व कार्यालयांच्या बाहेर आंदोलन करेल.
- प्रवीण दरेकर, नेते भाजप
Web Title: Take Over Coal Mine Chhattisgarh State Government Decision Import Coal Abroad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..