
सोलापूर : सध्या शिक्षकांवर अध्यापनाशिवाय अन्य कामांचाच भार अधिक असल्याने गुणवत्तेवर परिणाम होऊन शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शनिवारी शाळा सुटल्यावर व रविवारीच शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार आहेत. १५ जूनपूर्वी यासंबंधीचा शासन निर्णय काढला जाणार आहे. तत्पूर्वी, अध्यापनावर परिणाम करणारे उपक्रम, सर्व्हे, अशा बाबींचा अभ्यास करून अहवाल देण्याची जबाबदारी कोल्हापूर विभागाच्या उपसंचालकांवर सोपविली आहे.
लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी शिक्षकांना नेमले जाते. तत्पूर्वी, प्रत्येक निवडणुकीवेळी घरोघरी जाऊन मतदार यादीनुसार मतदारांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी देखील शिक्षकांवरच सोपविली जाते. त्यात १५ ते २० दिवस जातात. दुसरीकडे राज्य, केंद्र सरकारच्या विविध महत्वाच्या सर्व्हेसाठीही (जनगणना, आरक्षणासंदर्भातील सर्व्हे) शिक्षकांची मदत घेतली जाते. याशिवाय शिक्षण विभागाकडून वर्षभर १०० हून अधिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी अनेक नवीन उपक्रम येतात.
या सर्व उपक्रमांची माहिती जिओ टॅकिंगसह व्हिडिओ, फोटोसह ऑनलाइन भरण्यास सांगितले जाते. त्यासाठी चार ते आठ दिवसांचीच दिली जाते. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाऐवजी वरिष्ठ स्तरावरून मागविलेली ती माहिती भरण्यासाठीच वेळ द्यावा लागतो. आता हा प्रकार कायमचा बंद होणार असून शिक्षकांना सर्वाधिक वेळ अध्यापनासाठीच देता येईल, असे नियोजन केले जात आहे. शिक्षकांना भरावी लागणारी माहिती माध्यमिक शाळांमधील लिपिक किंवा ग्रामपंचायतींमधील डेटा ऑपरेटर भरू शकतात का, हा पर्याय देखील पडताळून पाहिला जात आहे.
ग्रामविकास विभागाला पत्रव्यवहार
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांकडून सांगितली जाणारी कामे शिक्षकांना प्रत्यक्ष न बोलवता ऑनलाइन करावीत. दुसरा पर्याय म्हणजे शनिवारी दुपारनंतर किंवा रविवारीच शिक्षकांकडून ती कामे करून घ्यावीत, यादृष्टीने नियोजन करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाला देखील पत्रव्यवहार केला आहे.
१५ जूनपूर्वी शिक्षकांची कमी होतील अशैक्षणिक कामे
शिक्षकांवर सध्या अध्यापनाच्या मुख्य कामाशिवाय अन्य कामांचाच भार अधिक आहे ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगट त्यावर काय उपाय करता येतील, यावर अभ्यास करत आहे. शिक्षकांना यापुढे शनिवारी दुपारनंतर व रविवारीच अशैक्षणिक आणि शैक्षणिक उपक्रमासंदर्भातील माहिती भरण्याची कामे दिली जातील. १५ जूनपूर्वी शिक्षकांची बरीच अशैक्षणिक कामे कमी होतील.
- सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
ग्रामपंचायत, नगरपरिषद, महापालिका कर्मचाऱ्यांची घेतली जाणार मदत
जिल्हा परिषदांच्या शाळांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने ती कामे शिक्षकांनाच करावी लागतात. दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय देखील शिक्षकांना करावी लागते. आता नवीन शैक्षणिक वर्षापासून त्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) कर्मचाऱ्यांवर सोपविली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.