राज्यात तापमानात होतेय वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

पुणे - देशातून माॅन्सून परतल्याने आकाश निरभ्र राहत आहे. त्यामुळे आॅक्टोबर हीटही हळूहळू वाढू लागली असून, उकाड्यात वाढ होत आहे. मुंबईजवळ असलेल्या सांताक्रूझमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे - देशातून माॅन्सून परतल्याने आकाश निरभ्र राहत आहे. त्यामुळे आॅक्टोबर हीटही हळूहळू वाढू लागली असून, उकाड्यात वाढ होत आहे. मुंबईजवळ असलेल्या सांताक्रूझमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

राज्यात वाढत असलेल्या आॅक्टोबर हीटमुळे कोकणातील बहुतांशी भागातील कमाल तापमानाच सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे कोकणातील कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सांताक्रूझनंतर मुंबईमध्ये कमाल तापमानाची ३७.० अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने तुरळक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्रात सोलापूरमध्ये कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस, तर महाबळेश्वरमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १७.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.

मराठवाड्यातील बहुतांशी ठिकाणचा कमाल तापमानाचा पारा हा ३४ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. बीडमध्ये सर्वाधिक ३७.० अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भातील अनेक भागांत हवामान कोरडे होते. त्यामुळे विदर्भाच्या अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली होती. अकोला येथे कमाल तापमान ३७.० अंश सेल्सिअस होते.

अरबी समुद्रात ‘लुबन’ चक्रीवादळ 
कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘लुबन’ या चक्रीवादळात रूंपातर झाले आहे. हे चक्रीवादळ ओमान आणि येमेनच्या दिशेने सरकत असून, पुढील चार ते पाच दिवसांनंतर त्याची तीव्रता कमी होणार आहे. मंगळवारी वादळाची तीव्रता वाढणार आहे.  

मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता 
अरबी समुद्रात तयार झालेले ‘लुबन’ चक्रीवादळ आणि बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील काही भागांत हवामान ढगाळ राहणार आहे. उद्या (ता. ९) आणि उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature Increase in State