Supreme Court On TET
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : परीक्षेच्या आदल्यादिवशी ‘टीईटी’चा पेपर फुटला आणि ऐनवेळी ६ लाख विद्यार्थ्यांचा पेपर रद्द करावा लागला. त्यानंतर परीक्षा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन, यावरील निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र समिती नेमली. मात्र, अजूनही या समितीला त्यावरील निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे परीक्षा दिवाळीनंतरच म्हणजे नोव्हेंबरअखेर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.
शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर २१ जून रोजी होणार होता, पण ‘नीट’चा पेपर फुटल्याने ‘टीईटी’चा पेपर २८ जूनला घेण्याचे ठरले होते. पण, परीक्षेच्या आदल्या दिवशीच पेपर फुटला आणि ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली. या परीक्षेसाठी सहा लाख १२५ उमेदवारांनी नोंदणी केली असून यात दोन लाख २६ हजार २६३ शिक्षक आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेतील शिक्षकांना (इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षक) ३१ ऑगस्ट २०२८ पूर्वी ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे, त्या सर्वांसाठी न्यायालयाचा हा निर्णय बंधनकारक आहे.
न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी शिक्षकांना ‘टीईटी’च्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी वर्षातून दोनदा ‘टीईटी’ घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पेपर फुटल्याने यंदा एकच ‘टीईटी’ होणार आहे. आता परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायची याचा निर्णय झाल्यानंतर तज्ज्ञांकडून ‘टीईटी’ ९ माध्यमांमध्ये नवीन प्रश्नपत्रिकांचे संच तयार करणे, परीक्षा केंद्रे निश्चिती, त्याठिकाणी ‘सीसीटीव्ही’सह यंत्रणेची पडताळणी करणे, विद्यार्थ्यांना हॉलतिकीटे देणे अशा कामांसाठी साधारणत: तीन महिने लागतील. त्यामुळे दिवाळी सुट्ट्यानंतरच ‘टीईटी’ होऊ शकते, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही दिवसांत होईल अंतिम निर्णय
‘टीईटी’चा पेपर फुटल्यानंतर यापुढील परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायची, यावर काही दिवसांत निर्णय होईल. पण, परीक्षा कशी घ्यायची याचा अंतिम निर्णय झाल्यापासून पुढील नियोजनासाठी साधारणत: अडीच ते तीन महिने लागू शकतात.
- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
ऑनलाइन परीक्षेला विरोध, ऑफलाइनमध्ये रिस्क
‘टीईटी’साठी यंदा सहा लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या उमेदवारांची एकाच दिवशी परीक्षा ऑनलाइन घेण्याइतकी सुरक्षित यंत्रणा तथा परीक्षा केंद्रे नाहीत. त्यामुळे आगामी परीक्षा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन याचा निर्णयच झालेला नाही. राज्याचे मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, असे वरिष्ठ अधिकारी त्यावर निर्णय घेणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.