
Maharashtra Politics : तुमच्या कर्तृत्वाला सलाम, फक्त....; ठाकरे गटाचं शिंदे गटाला चॅलेंज
हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच विरोधक अणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली. अधिवेशनात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यांच युद्ध चांगलंच रंगताना दिसून आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमोल मिटकरी, अनिल परब यांचा चांगलाच आक्रमकपणा दिसून आला.
दरम्यान एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार-खासदार यांच्यासह बंड केलं यावरूनही अधिवेशनात शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यातही बाळासाहेब ठाकरेंवरील अधिकारावरून शाब्दिक युद्ध झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बाळासाहेबांच्या पायांना हात लावून सांगा असे अनिल परब यांनी म्हणताच एकनाथ शिंदे आक्रमक होत म्हणाले की, तुम्ही बाळासाहेबांच्या पायांना हात लावण्याचा अधिकार गमावला आहे यावरून दोघांमध्ये चांगलीच चढाओढ दिसून आली.
हेही वाचा: झेडपी शिक्षकांची पंचाईत! निधी नसल्याने १ तारखेला नव्हे महिन्यातून दोनदा पगारी
ठाकरे गटाचे नेते अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, 'आमचा तुमच्या कर्तृत्वावर संशय नाही. तुम्ही शिवसेनेचे आमदार, खासदार घेऊन गेला. त्यांची जबाबदारी देखील तुम्ही घेतलीत. तुमच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. फक्त बाळासाहेबांच्या पायांना हात लावून सांगा की, येणाऱ्या निवडणुका तुम्ही भाजपची मदत न घेता लढवाल. त्यांच्या तिकिटावर नाही तर स्वत:च्या हिंमतीवर जिंकून दाखवाल, मग आम्हाला खरा आनंद होईल', असा खोचक टोला अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना बोलताना लगावला आहे.
हेही वाचा: Winter Session : सीमावासीयांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र विभाग - एकनाथ शिंदे
परब यांच्या या बोलण्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हंटलं की, 'बाळासाहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडणूक जिंकलात आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तेत बसलात, वरून आम्हाला निर्लज्ज म्हणता. मी कधी कोणावर टोकाची टीका केली नाही. पण काही जण सीमा ओलांडतात, तेव्हा आम्हालाही बोलावे लागते. ज्या क्षणी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसलात, तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या पायांना हात लावण्याचा अधिकार गमावला,' असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला आहे.