राज्यातील थॅलेसेमियाग्रस्तांच्या संख्येबाबत संभ्रम

दीपक कुलकर्णी
सोमवार, 14 मे 2018

नंदुरबार - राज्यातील सर्वत्र थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राज्यात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची नेमकी आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीस काहीसा वेळ लागण्याची शक्‍यता आहे. सरकार आणि रुग्णांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या आकडेवारीत तफावत आहे.

थॅलेसेमियाने त्रस्त सर्व रुग्णांना त्यांच्या गावाजवळच्या आरोग्य केंद्रात मोफत गोळ्या उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. असे असले तरी या आजाराचे रुग्ण किती, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. गोळ्यांची मागणी लक्षात घेऊन त्यापद्धतीने तातडीने नियोजन करण्यात येणार आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे पालक आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत रुग्णांच्या आकडेवारीतील तफावत समोर आली. सरकारी नोंदीनुसार राज्यात या आजाराचे 8 हजार, तर संस्थांच्या नोंदीनुसार 30 हजार रुग्ण आहेत. राज्यात तूर्त ही सहा ठिकाणी या गोळ्या उपलब्ध करून दिल्या जातात.

प्रबोधनासाठी मोहीम
राज्यात थॅलेसेमिया आजाराचे प्रमाण वाढत आहे. मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. या आजाराबाबत गरोदरपणात काळजी घेतल्यास तो टाळता येऊ शकतो. गरोदर महिलेत हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळल्यास डॉक्‍टरांनीही थॅलेसेमिया संदर्भातील चाचण्या करून घ्याव्यात. याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.

राज्यातील रुग्ण
सरकारी आकडेवारी : 8,000
संस्थांकडील आकडेवारी : 30,000

राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांवर सामान्य रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. या आजाराबाबत जनजागृती करण्याची आवश्‍यकता असून, अकोला येथे हे कार्य थॅलेसेमिया सोसायटीच्या माध्यमातून केले जाते. अशा रुग्णांना मोफत रक्‍तपुरवठादेखील केला जातो.
- डॉ. हरीश आलिमचंदानी, अध्यक्ष, थॅलेसेमिया सोसायटी, अकोला

Web Title: thalassemia affected patient sickness