तडे गेले, तरी गड शाबूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsainik in Mumabi

मुंबईतील पाच आमदारांनी बंडखोरी केली असताना त्यांच्या मतदारसंघातील पदाधिकारी मात्र भक्कमपणे शिवसेनेसोबत आहेत.

तडे गेले, तरी गड शाबूत

- विनोद राऊत, हेमलता वाडकर, महेंद्र दुसार, प्रसाद जोशी

ठाणे शिवसेनेचा श्वास, तर मुंबई शिवसेनेचा प्राण समजला जातो. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या बंडाची सर्वाधिक झळ मुंबईला बसणार आहे. हजारो शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान असलेली ‘मातोश्री’ आणि ‘शिवसेना भवन’ ही दोन्ही महत्त्वाची केंद्रं मुंबईत आहेत. त्यामुळे बंडखोरांविरुद्धच्या लढाईचे मुख्य केंद्र मुंबईत आहे. त्यासोबतच रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही बंडखोरांविरोधात स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी असली, तरी आगामी निवडणुकीत त्यांच्याविरोधात उमेदवार शोधताना मात्र शिवसेनेचा कस लागणार आहे.

मुंबईतील पाच आमदारांनी बंडखोरी केली असताना त्यांच्या मतदारसंघातील पदाधिकारी मात्र भक्कमपणे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे तडे गेले असले, तरी शिवसेनेचा गड मात्र शाबूत असल्याचे चित्र आहे. माहीमचे आमदार सदा सरवणकर यांच्या २००९ मधील काँग्रेसवारीमुळे स्थानिक शिवसैनिकांचा प्रचंड रोष आहे. सरवणकर यांच्या बंडखोरीमुळे सामान्य शिवसैनिक त्यांच्याविरुद्ध उतरण्याची शक्यता आहे. भायखळा मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा गड होता; मात्र अलीकडे तेथील मतदारांचा कौल बदलता आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचे पती आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा मतदारसंघ स्वबळावर खेचून आणला. या मतदारसंघात जाधव यांच्याशिवाय इतर कणखर नेतृत्त्व नाही. मागाठाण्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्वबळावर सहा ते सात नगरसेवक जिंकून आणले आहेत. हे सर्व नगरसेवक सुर्वे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. चांदिवलीतील बंडखोर आमदार दिलीप लांडे यांचा मतदारसंघात वैयक्तिक संपर्क दांडगा आहे. शिवाय त्यांच्या विरोधात कुणीही प्रबळ प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांची बाजू भक्कम आहे. कुर्ला विधानसभा मतदारसंघात अनेक शिवसैनिक मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात गेले आहेत.

वनगांविरुद्ध नाराजी

पालघर जिल्ह्यात एकमेव शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा यांना आगामी काळात बंडखोरीचा मोठा फटका बसू शकतो. श्रीनिवास वनगा हे भाजपचे जेष्ठ नेते दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र आहेत. त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी दोन सभा घेत निवडून आणले. परंतु आता त्यांनी बंडखोरी केल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना पालघर जिल्ह्यातून पाठिंबा मिळण्याची शक्यता धूसर आहे. वनगा यांच्या विरोधात शिवसेनेला नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे.

बंडखोरीचे केंद्रबिंदू ठाणे

शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना असे समीकरण आतापर्यंत जिल्ह्यात पाहायला मिळत होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बंडखोरीचे ठाणे असेच म्हणावे लागणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमध्ये जिल्ह्यातील पाचही आमदार सहभागी झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यात एकूण तीन लोकसभा आणि १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात मोदी लाटेमुळे सर्वाधिक ८ आमदार हे भाजपचे आहेत. तर शिवसेनेचे पाच, राष्ट्रवादीचे दोन, अपक्ष, समाजवादी, मनसे प्रत्येकी एक आमदार आहे.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री एकनाथ शिंदे निवडून आले. सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले असून त्यांची मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यावर पकड आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतरही त्यांना मानणारा मोठा गट शिंदे यांच्या बाजूनेच उभा असल्याचे दिसते. विशेषतः ठाणे शहरामध्ये. याची पहिली झलक शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा महापौर नरेश म्हस्के यांच्या पदाच्या राजीनाम्यामुळे दिसली. शहरातील बहुतेक नगरसेवक व पदाधिका-यांचाही शिंदे यांना पाठिंबा असल्याचे दिसते. म्हणूनच बंडखोरी केल्यानंतरही त्यांच्या विरोधात बोलण्यासही कुणी धजावत नाही.

ओवळा-माजिवाडा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक तीनदा निवडून आले. हा मतदारसंघ सुशिक्षित समजला जातो. येथे भाजपचे वर्चस्व वाढत आहे. मात्र तरीही गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी सरनाईक निवडून आले. सरनाईक यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी एखाद्या नगरसेवकाला किंवा मीरा-भाईंदरमधून उमेदवार शोधावा लागणार आहे. हे दोन मतदारसंघ सोडले तर भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ आणि कल्याण पश्चिममधील परिस्थिती वेगळी आहे.

भिवंडी ग्रामीणचे बंडखोर आमदार शांताराम मोरे हे कधीकाळी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांचे चालक होते. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यामुळे शांताराम मोरे यांना २०१४ मध्ये शिवसेनेने पहिली संधी दिली. या मतदारसंघात प्रकाश पाटील यांचे काम उत्तम असल्याने त्याचा फायदा मोरे यांना मिळाला. मोरे यांच्या बंडखोरीमुळे भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे मोरे यांना पुढील निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

कल्याण पश्चिमेवर शिवसेनेने २०१४ साली भगवा फडकवला. नगरसेवक विश्वनाथ भोईर यांना आमदारकीची लॉटरी लागली. त्यानंतर २०१९मध्येही ते निवडून आले. या मतदारसंघात शिवसेनेची पकड मजबूत आहे. त्यांना पर्याय म्हणून अनेक नावेही शर्यतीत आहेत. त्यापैकी एक नाव बंड्या साळवी आहे. भोईर यांच्या विरोधात त्यांनी आघाडी घेतली असून येथील कट्टर शिवसैनिकांची त्यांना साथ मिळताना दिसत आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघही शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. अनेक इच्छुक आमदारकीच्या स्पर्धेत आहेत.

निष्ठावंतांचा पुढाकार

रायगडमधील शिवसेनेचे तीनही आमदार शिंदे गटात सहभागी झाल्याने येथील शिवसेना सध्यातरी नेतृत्वहीन झाली आहे. या बंडखोर आमदारांविरोधात निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात संताप तीव्रपणे खदखदत आहे. रायगड जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा बाल्लेकिल्ला बंडखोरांनी काबीज केला असल्याने त्याच्या मुक्ततेसाठी निष्ठावंत शिवसैनिक पुढे सरकावताना दिसत आहे.

सद्य:स्थिती

  • रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात बंडखोरांविरुद्ध कार्यकर्ते नाराज

  • मुंबईतील पाच आमदारांची बंडखोरी, पदाधिकारी मात्र शिवसेनेसोबत

  • ओवळा-माजिवाड्यात भाजपची ताकद वाढतेय

  • कल्याण पश्चिम व अंबरनाथमध्ये बंडखोरांविरुद्ध तीव्र नाराजी

  • पालघरमध्ये वनगांवर शिवसैनिकांचा रोष

Web Title: Thane Mumbai Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde Mla Rebel Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top