
solapur flood
solapur
तात्या लांडगे
सोलापूर : सर्पदंश झाल्याने पाथरी येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री दूध घेऊन जात असताना या शेतकऱ्याला सर्पदंश झाला होता. गेल्या पाच दिवसापासून त्यांच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. केराप्पा बजरंग बंडगर (वय ५८) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, पाथरी येथील केराप्पा बंडगर हे रविवारी रात्री दूध घेऊन घराकडे निघाले असता सायंकाळी साडेसातच्या सुमारास रस्त्यावरून चालत जात असताना त्यांना घराजवळ सर्पदंश झाला. पुरामुळे वाहून आलेल्या गवतात साप होता. दूध घालून घरी आल्यावर साप चावला की काय, असे म्हणून ते जागेवरच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांच्या मुलाने तातडीने त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. बंडगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे पाथरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सीना नदीचा महापूर ओसरला असून, सध्या सीनेत ४५ हजार १०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. विसर्ग कमी झाला तरीदेखील पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना अजूनही संभाव्य धोक्याची धास्ती आहे. सीना-कोळेगाव, चांदणी, खासापुरी या धरणांतून एकदम सीना नदीत सव्वादोन लाख क्युसेकचा विसर्ग पहिल्यांदाच सोडला गेला. त्यामुळे नदी पात्रापासून दोन ते पाच किलोमीटर अंतरावर सीनेचे पाणी पसरले होते. त्यात अनेक शाळा व घरांमध्ये पाणी शिरले आणि बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यांमधील नदी काठावरील लोकांना घरदार सोडून दुसरीकडे राहावे लागले. त्यांच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग होता. तीन दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरले आहे, पण महापुराचे पाणी घरात शिरल्याच्या खुणा अजूनही ताज्या आहेत. हवामान खात्याकडून सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, बीड या जिल्ह्यांसाठी रेड, यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना अजूनही शांत झोप लागत नाही, अशी स्थिती आहे.
सीनेतील सध्याचा विसर्ग
भोगावती नदीतून : १० हजार क्युसेक
सीना-कोळेगाव धरणातून : ३२ हजार ५०० क्युसेक
चांदणी धरणातून : १४०० क्युसेक
खासापुरी धरणातून : १२०० क्युसेक
‘हे’ आवर्जुन लक्षात ठेवा...
घरात पुराचे पाणी शिरल्याने साप, विंचू असू शकतात, घरात गेल्यावर लगेचच साहित्य उचकटू नका
घरात जाण्यापूर्वी आतमध्ये साप, विंचू नसतील याची खात्री करा, स्वच्छता करताना काळजी घ्या
घरातील अडचणीतील साहित्य मोकळ्या जागेत आणून ठेवा, अडचणीत हात घालू नका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.