सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! 6000 लाच घेताना दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात, एक फरार; सोलापूरच्या वेतन पथक व भविष्य निवार्ह निधी कार्यालयाच्या अधीक्षकासह, लिपिक व एका शाळेच्या ग्रंथपालावर गुन्हा

सोलापुरातील वेतन पथक व भविष्य निवार्ह निधी कार्यालयाचे अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड (वय ५५, रा. होडगी रोड, मंगल रेसिडेन्सी, सोलापूर) व करमाळ्यातील चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालयाचे ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले (वय ५५) यांना सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास कार्यालयाबाहेर झाली.
anti corruption buro, solapur

anti corruption buro, solapur

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : येथील वेतन पथक व भविष्य निवार्ह निधी कार्यालयाचे अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड (वय ५५, रा. होडगी रोड, मंगल रेसिडेन्सी, सोलापूर) व करमाळ्यातील चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालयाचे ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले (वय ५५) यांना सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास कार्यालयाबाहेर झाली. यातील एकजण फरार असून त्याच्या शोधासाठी एक पथक रात्री उशिरा रवाना करण्यात आले होते.

तक्रारदाराला मुलाच्या शिक्षणासाठी स्वत:च्या हक्काचा पाच लाख रुपयांचा जी-पीएफ काढायचा होता. त्यांनी वेतन पथक व भविष्य निवार्ह निधी कार्यालयाकडे तसा अर्ज केला होता. मात्र, ती रक्कम काढून देण्यासाठी संशयित आरोपी अधीक्षक बालवाड व बारबोले या दोघांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी केली होती. तर यातील तिसरा संशयित आरोपी कार्यालयातील लिपिक अण्णासाहेब दगडू मेटकरी याने चार हजार रुपये, असे एकूण सहा हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. तक्रारदारास पाच लाख रुपये तातडीने पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शविली, पण त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

कारवाईपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीसंदर्भात पडताळणी केली होती. त्यात तिघेही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरूवारी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बारबोले याने कार्यालयाखालीच लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील दोघे ताब्यात

तक्रारदाराकडून त्यांचा जी-पीएफ काढण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्यांमध्ये खुद्द वेतन पथक व भविष्य निवार्ह निधी कार्यालयाचे अधीक्षक आहेत. लक्ष्मण बालवाड हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून त्यांचे वय ५५ आहे. तर लाचेची रक्कम स्वीकारणारा विक्रम बारबोले याचेही वय ५५ वर्षे आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देखील त्यांना लाचेचा मोह आवरला नाही. एक हजार रुपयांसाठी आता त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना उद्या (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. यातील मेटकरी फरार असून त्याच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. तर अधीक्षक बालवाड याच्या लातूर जिल्ह्यातील वायगाव येथील घराचीही झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले होते. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलिस निरीक्षक शैलेश पवार, हवालदार सलिम मुल्ला, स्वामीराव जाधव, शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, राजू पवार, रवी हटकिले, सचिन राठोड, अक्षय श्रीराम यांच्या पथकाने पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com